एक्स्प्लोर
कोण होणार ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी?
ऑस्ट्रेलियन ओपनला यंदा मिळणार आहे नवी राणी. या स्पर्धेच्या महिला एकेरीत सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकीनं पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकीमधला हा अंतिम सामना उद्या (शनिवार, २७ जानेवारी) दुपारी खेळवण्यात येईल.

सिडनी : सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकी... जागतिक क्रमवारीतल्या या नंबर वन आणि नंबर टू टेनिसपटूंमध्येच रंगणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची अंतिम लढाई. जिंकणारी वीरांगना ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाची मानकरी ठरेलच, पण जागतिक क्रमवारीतला नंबर वनही तिचाच होईल. सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकी या दोघीनांही आजवरच्या कारकीर्दीत ग्रँड स्लॅम मानाचं एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळं दोघीही ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतील. रोमानियाच्या सिमोना हालेपनं उपांत्य सामन्यात माजी विजेत्या जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचं कडवं आव्हान 6-3, 4-6, 9-6 असं मोडीत काढलं. तसंच डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीनं बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा 6-3, 7-6 असा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियन ओपन फायनलच्या निमित्तानं हालेप आणि वोझ्नियाकी या दोघी आजवरच्या कारकीर्दीत सातव्यांदा आमनेसामने येतील. आजवरच्या सहा सामन्यांमध्ये वोझ्नियाकीनं सर्वाधिक चारवेळा बाजी मारली आहे. पण दोघींचा ताजा फॉर्म लक्षात घेता हालेपला झुकतं माप देण्यात येऊ शकतं. सिमोना हालेपनं गेल्या दहापैकी एकही सामना गमावलेला नाही. तर वोझ्नियाकीला गेल्या दहापैकी एका सामन्यात हार स्वीकारावी लागली आहे. सिमोना हालेपची ग्रँड स्लॅम फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. तिनं 2014 आणि 2017 साली फ्रेन्च ओपनची अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्हीवेळा तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. हालेपच्या खात्यात फ्रेन्च ओपनच्या दोन उपविजेतेपदांसह सहा डब्ल्यूटीए विजेतीपदं जमा आहेत. तसंच ऑक्टोबर महिन्यापासून हालेप जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. कॅरोलिन वोझ्नियाकीनंही कारकीर्दीत तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमच्या फायनलचं तिकीट मिळवलं आहे. तिनं 2009 आणि 2014 साली अमेरिकन ओपनची फायनल गाठली होती. पण वोझ्नियाकीच्या पदरी दोन्हीवेळा निराशाच आली. अमेरिकन ओपनच्या दोन उपविजेतेपदांसह कॅरोलिन वोझ्नियाकीनं डब्ल्यूटीएच्या तब्बल 27 विजेतीपदांवर आपलं नाव कोरलं आहे. 2017 सालच्या फ्रेन्च ओपनपासून टेनिसविश्वाला प्रत्येक ग्रँडस्लॅमनं एक नवी विजेती दिली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या रणांगणातही तीच परंपरा सुरु राहणार आहे. त्यामुळं आता ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी कोण होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
आणखी वाचा























