Asian Games 2018: गोळाफेकीत तजिंदर पाल सिंगची 'सुवर्ण'कमाई
तेजिंदरपालसिंग तूरनं नव्या स्पर्धाविक्रमासह एशियाडमध्ये गोळाफेकीच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. तेजपालनं गोळाफेकीच्या पाचव्या प्रयत्नात 20.75 मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी बजावली.
जकार्ता : भारताच्या तेजिंदरपालसिंग तूरनं नव्या स्पर्धाविक्रमासह जकार्ता एशियाडमध्ये गोळाफेकीच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. तेजपालनं गोळाफेकीच्या पाचव्या प्रयत्नात 20.75 मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी बजावली.
या कामगिरीनं तेजिंदरपालला एशियाडच्या सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला. त्यानं ओमप्रकारश करहानाचा 20.69 मीटरचा विक्रम मोडीत काढला. तेजिंदरपालनं गेल्या वर्षी 20.24 मीटरवर गोळाफेक केली होती. याच कामगिरीमुळे त्याच्याकडून एशियाडमध्ये गोळाफेकीच्या सुवर्णपदकाची अपेक्षा करण्यात येत होती. तेजिंदरपालनं जकार्तात आपली कामगिरी आणखी उंचावून एशियाडचं सुवर्णपदक जिंकलं.
एशियाड गेम्सच्या सातव्या दिवशी भारताचं समिश्र प्रदर्शन पाहायला मिळालं. आज भारताला स्क्वॉशमध्ये तीन कांस्य पदक आणि एक सुपर्ण पदक मिळालं. भारत अंकतालिकेत आतापर्यंत 29 पदकांसह आठव्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये सात सुवर्ण, पाच रौप्य आणि 17 कांस्य पदकांचा समावेश आहे.
स्क्वॉशमध्ये तीन कांस्य पदकांची कमाई एशियाडमध्ये भारतानं सातव्या दिवशी स्क्वॉश प्रकारात तीन कांस्यपदकांची कमाई केली. दीपिका पल्लिकल, जोश्ना चिन्नप्पा आणि सौरव घोषालला आपापल्या गटात उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या तिघांनाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
दीपिका पल्लिकलला महिला एकेरीच्या उपांत्य़ सामन्यात गतविजेत्या मलेशियाच्या निकोल डेव्हिडकडून हार स्वीकारावी लागली. महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोश्ना चिन्नप्पावर मलेशियाच्या एस सुब्रमण्यमनं मात केली. तर पुरुष एकेरीत सौरव घोषालचं आव्हान हॉन्गकॉन्ग चीनच्या चुंग मींग उनं मोडीत काढलं.