(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20WorldCupFinal | महिलादिनी भारतीय महिला संघ नवा इतिहास घडवणार?
हरमनप्रीत कौरचा भारतीय महिला संघ ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरणार का? महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली फायनल उद्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येईल. या विश्वचषकाच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारलीय. ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरी गाठण्याची ही सलग सहावी वेळय. त्यामुळं उभय संघांत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड भासत आहे.
मेलबर्न : हरमनप्रीत कौरची भारतीय विमेन ब्रिगेड की, मेग लॅनिंगची टीम ऑस्ट्रेलिया. कोण जिंकणार मेलबर्नचं महायुद्ध? महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकावर कोण कोरणार आपलं नाव?
महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली फायनल उद्या ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येईल. ही फायनल जिंकून भारताचा महिला संघ ट्वेन्टी20 विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरणार का, हा प्रश्न सध्या भारतीय क्रिकेटरसिकांच्या ओठावर आहे. ट्वेन्टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमधली फायनल आजवरची ड्रीम फायनल ठरावी. ट्वेन्टी20च्या जगात ऑस्ट्रेलिया ही नंबर वन टीम आहे आणि यंदा ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा यजमानही आहे. त्याच ऑस्ट्रेलियासमोर विश्वचषकाच्या फायनलमध्ये जगातल्या सर्वात लोकप्रिय संघाचं म्हणजे भारतीय संघाचं आव्हान आहे. त्यामुळं ही फायनल आणि ट्वेन्टी20चा सातवा विश्वचषक कोण जिंकणार याविषयी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी उत्सुकता आहे.
ट्वेन्टी२०च्या इतिहासात ऑस्ट्रेलियानं सहापैकी चारवेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऑस्ट्रेलियाची ही सलग सहावी वेळ आहे. त्या तुलनेत हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ कच्चा असला, तरी उमेदीचा आहे. भारतीय महिलांनी ट्वेन्टी20 विश्वचषकाची फायनल गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण यंदा विश्वचषकाच्या साखळीत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा पराक्रम गाजवला आहे.
भारतीय महिलांनी साखळीत ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी हरवलं असलं तरी फायनलच्या रणांगणात त्याच निकालाची पुनरावृत्ती होईल याची खात्री देता येत नाही. याचं कारण उभय संघांमधला तो सामना सिडनीच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात लेग स्पिनर पूनम यादवनं चार विकेट्स काढून ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सिडनीत फिरकी आक्रमणासमोर लोंबकळलेला तो ऑस्ट्रेलिया संघ मेलबर्नच्या पाटा खेळपट्टीवर आपल्या फलंदाजीत नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं भारताच्या पूनम यादव, राधा यादव, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या फिरकी चौकडीसमोर त्यांना गुंडाळण्याचं मोठं आव्हान असेल.
शेफाली वर्माची धडाकेबाज सलामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात जमेची बाजू ठरावी. तिनं साखळीतल्या चार सामन्यांमध्ये सर्वाधिक 161 धावांचा रतीब घातला आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक नऊ षटकारही तिच्याच नावावर जमा आहेत. पण विश्वचषक जिंकायचा तर भारताच्या लेडी सहवागला स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिक्स आणि वेदा कृष्णमूर्तीकडूनही तोलामोलाची साथ मिळायला हवी.
भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांच्या कामगिरीचा योग जुळून आला तर हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाला विश्वचषक विजयाचा नवा इतिहास घडवण्यापासून कुणालाही रोखता येणार नाही. आणि तसं झालं तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा आनंद द्विगुणित होईल.