INDvsENG Test : शेवटच्या दिवशी विजयासाठी टीम इंडियाला 157 धावा आवश्यक, आज सामन्यात रोमांच
INDvsENG 1st Test : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या (india vs england 1st test live)पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे.
INDvsENG 1st Test : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या (india vs england 1st test live)पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे. टीम इंडियाकडे 9 विकेट्स शिल्लक असून केएल राहुल मात्र काल चौथ्या दिवशी बाद झाला. नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला. भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 52 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात चांगली खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. चौथ्या दिवसअखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर खेळत आहेत. अद्याप टीम इंडियाला विजयासाठी 157 धावांची गरज आहे.
दुसऱ्या डावात कर्णधार रुटचे शानदार शतक
इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 25 धावांवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव चौथ्या दिवशी 303 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून जो रुटने 109 धावा केल्या. जो रुटला जॉनी बेअरस्टोने 30 आणि त्यानंतर सॅम करनने 32 धावा करत चांगली साथ दिली. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
पहिल्या डावात लोकेश राहुलची चांगली खेळी
पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या. त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स घेतल्या.