(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मॉडेल बनण्याचं स्वप्न ठरलं महाग! बहिणीची भावाकडून गोळी झाडून हत्या
Honor Killing : मॉडेलिंगची आवड असणाऱ्या बहिणीची भावाने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pakistan Honor Killing : कुटुंबाच्या खोट्या मानसन्मानासाठी एका निरपराध तरुणीची हत्या करण्यात आली आहे. मॉडेलिंगची आवड असणाऱ्या बहिणीची भावाने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना पाकिस्तान येथील लाहौर येथे घडली आहे. एका भावाने त्याच्या 21 वर्षीय बहिणीची गोळ्या झाडून निघृण हत्या केली आहे. या तरुणीला डान्स आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं होतं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाहौरपासून 130 किलोमीटर दूर रेनाला खुर्द ओकारा भागात राहणारी सिदरा ही तरुणी एका स्थानीय कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत होती. यासह ती फैजलाबाद येथील एका थिएटरमध्ये डान्सही करायची.
सिदराच्या आई-वडीलांनी तिला हे काम सोडण्यास सांगितले होते. सिदराच्या कामामुळे तिचे कुटंबिय खुश नव्हते. त्यांनी वारंवार सिंदराला मॉडेलिंग आणि डान्सिंग सोडण्यास सांगितले. मात्र सिदराने कुटुंबियांच्या विरोधात जात घरापासून दूर फैजलाबाद येथे राहून तिच्या आवडीचे काम करण्याचा निर्णय घेतला.
हे आपल्या कुटुंबाच्या परंपरेविरोधात असल्याचं सांगत सिदराच्या आई-वडीलांनी तिला हे काम सोडण्यास भाग पाडलं. सिदरा ईद साजरी करण्यासाठी घरी आली होती. यावेळी सिदराचा तिच्या आईवडील आणि भावासोबत याचं कारणावरून भांडण झालं.
सिदराचा भाऊ हमजा यानेही सिदराला मॉडेलिंग आणि डान्स सोडण्यास जबरदस्ती केली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. यानंतर हमजाने सिदराच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये सिदराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी हमजाच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
याचं वर्षी फेब्रुवारीमध्येही फैजलाबाद येथे 19 वर्षीय डान्सर आएशाची तिच्या पतीने गोळी मारुन हत्या केली होती. पाकिस्तानमध्ये उत्तर आणि पश्चिम आदिवासी भागात ऑनर किलिंगची अनेक प्रकरण समोर आली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :