Sri Lanka : श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची घोषणा
Emergency In Sri Lanka : आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ही घोषणा केली आहे.
Emergency In Sri Lanka : श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होताना दिसत आहे. याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्याची घोषणा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आर्थिक संकटामुळे जनता रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात निदर्शनं करत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रपती राजपक्षे यांनी हा निर्णय जनतेच्या सुरक्षेसाठी आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहण्यासाठी घेतला आहे. राष्ट्रपती निवासाबाहेर 1 एप्रिल रोजी जनतेने निदर्शनं केल्यानंतरही आणीबाणी लागू करण्यात आली होती. ही आणीबाणी 5 एप्रिल रोजी मागे घेण्यात आली. आता पुन्हा एकदा राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांना विशेष अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात संशयितांना अटक करु शकतात किंवा ताब्यात घेऊ शकतात.
श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्षाने नुकताच सरकार आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. विरोधकांचा आरोप आहे की, जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, तेव्हा राजपक्षे यांनी त्यांची कामगिरी योग्यप्रकारे बजावलेली नाही. मुख्य विरोधी पक्ष, समगी जना बालवेगयाने (SJB) SLPP युती सरकारच्या विरोधात दोन अविश्वास प्रस्ताव संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांच्याकडे सादर केले.
गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सत्तेवरून काढून टाकण्यासाठी 225 सदस्यीय संसदेत बहुमत आवश्यक आहे. युनायटेड पीपल्स फोर्सकडे 54 मते आहेत आणि त्यांना छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षाकडे सुमारे दीडशे मते आहेत, मात्र आर्थिक संकटाच्या काळात ही संख्या कमी झाल्याने काही नेते पक्षाच्या विरोधात जाण्याची भीती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :