(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi : पोहायला गेले आणि घात झाला, भिवंडीत पाण्यात बुडून चिमुरड्यांचा मृत्यू
Bhiwandi Accident : पाण्याचा अंदाज न आल्याने एका सात वर्षाच्या मुलाचा आणि बारा वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला.
ठाणे : मित्रांसोबत पाण्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भिवंडीत घडली आहे. मयत मुलांमध्ये एक सात वर्षांचा मुलगा तर एक बारा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वसीम मलिक (वय 7 वर्षे) रा. फातिमा नगर आणि अंजुम फत्ते मो. रफिक (वय 12 वर्ष) रा.धामणगाव धापशी पाडा असे मयत मुलांची नावं आहेत.
वसीम हा तालुक्यातील वडपा धामणगाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी हा मुलगा आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम आणि इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे साचलेल्या ओव्हळाच्या पाण्यात पोहायला गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
यावेळी बाजूला उभ्या असलेल्या दोन साथीदारांनी आरडाओरड केल्याने येथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने मुलांचा आवाज ऐकून पाण्यातून मुलांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र येथे येण्याआधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेबाबत तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू
दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडीत घडली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी सकाळी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय 48) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (18, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली. करोली टी येथील राजेंद्र चव्हाण आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावालगतच्या ग्रामस्थांना त्यांचे धुणे दिसले, मात्र जवळपास कोणी दिसत नसल्याने संशय आल्याने पाण्याजवळ जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह दिसले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली.
ही बातमी वाचा: