Pandharpur News : पंढरपूरच्या विकासासाठी अधिकाऱ्यांचा आता तिरुपती दौरा, दोन हजार कोटींचा आराखडा तयार, मग दौरे कशासाठी?
पंढरपूरच्या (Pandharpur) विकासासाठी काशीनंतर आता तिरुपती पॅटर्नच्या (Tirupati Pattern) अभ्यासाला अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे.
Pandharpur News : पंढरपूरच्या (Pandharpur) विकासासाठी काशीनंतर आता तिरुपती पॅटर्नचा (Tirupati Pattern) अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी आणि पंढरपूरचे मुख्याधिकारी या चार अधिकाऱ्यांचे पथक दोन दिवसांच्या तिरुपती दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. तिरुपती येथे असणारी दर्शन व्यवस्था, भाविकांची निवास व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन यासंदर्भात माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, एका बाजूला दोन हजार कोटींचा आराखडा तयार असताना हे अभ्यास दौरे नेमके कशासाठी? असा सवाल भाविक करत आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकाऱ्यांचे पथक तिरुपती दौऱ्यावर आहे. यामध्ये पंढरपूर विकासासाठी तिरुपती पॅटर्नचा अभ्यास करण्यात येणार आहे. तिरुपतीमध्ये असणारी दर्शन व्यवस्था, भाविकांची निवास व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन यासंदर्भात माहिती घेतली जाणार असल्याचे समजते. मात्र, प्रशासनाने काशी दौऱ्याप्रमाणेच तिरुपती दौऱ्याबाबत देखील मोठी गोपनीयता बाळगल्याची माहिती मिळत आहे. आता या तिरुपती दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक नाशिक कुंभमेळा व्यवस्थापन आणि नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापन याचाही अभ्यास दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाविकांसाठी दर्शन रांगेबाबत अभ्यास होणार
तिरुपती हे भारतातील एक मोठे देवस्थान असून, इथे वर्षभर आणि उत्सव काळात लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात. तिरुपती येथील दर्शन व्यवस्था भाविकांसाठी अतिशय सुखदायी असल्याने याचा अभ्यास विठ्ठल दर्शन रांगेबाबत होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला बाराही महिने दर्शन रांगेत हजारो भाविकांची गर्दी असते. यातच यात्रा काळात भाविकांना 30-30 तास दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागते. यामुळं भाविकांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मात्र, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनात ठेऊन वारकरी तसेच रांगेत उभा राहिलेले असतात. तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांग उभारण्यासाठी दर्शन रांगेच्या आराखड्यात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. याशिवाय तिरुपती येथे भाविकांच्या निवासासाठी मोठं मोठं भक्त निवास उभारलं आहे. त्यापद्धतीनं सर्वसामान्य भाविकांना निवाऱ्यासाठी मोठे हॉल आणि स्वच्छतागृहे उभी करता येतील का? यावर देखील विचार होणार आहे. दरम्यान, काशी पॅटर्नची जोरदार चर्चा झाली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक देखील झाली होती.
तिरुपतीनंतर नाशिक आणि नांदेडचाही अभ्यास दौरा होणार
तिरुपतीच्या दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांचा नाशिक आणि नांदेडला देखील अभ्यास दौरे होणार आहे. त्यानंतर पंढरपूरचा विकास आराखडा बनवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. काशी येथील गंगेच्या काठावर असणाऱ्या घाटांप्रमाणं चंद्रभागेवरील घाटांचा आराखडा बनवण्यात येणार आहे. याच पद्धतीनं काशी पॅटर्नमध्ये काशीचा स्मार्ट सिटीप्रमाणं पंढरपूरमध्येही आराखडा बनवण्यात येणार आहे. हे सर्व सुरु असताना नुकतीच पंढरपूरच्या विकासासाठी विठ्ठल मंदिर ते पालखी मार्गासाठी दोन हजार कोटींचा आराखडा बनवल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले आहे. जर आराखडा आधीच तयार असेल तर हे अभ्यास दौऱ्यात काय साध्य होणार हा प्रश्न सर्वसामान्य वारकरी भाविकांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: