Ajit Pawar : सरकारला सत्तेची मस्ती आली आहे, अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.
Ajit pawar : राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार तासगाव तालुक्यातील आरवडेत बोलत होते. अजित पवार सांगली (Sangli News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज दिवसभर तासगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचा लोकार्पण आणि विविध विकासकामांचा शुभारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील उपस्थित होते.
यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, "सरकारचं काय चाल्लंय? आम्ही आर आर अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण आम्ही असं कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कंर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व 50 खोके सरकार ओके. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल."
ते पुढे म्हणाले, "राज्याच्या मंत्री मंडळात एक पण महिला नाही, तुमच्या पोटात दुखतं का? महिलांना का घेत नाही? विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे." मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांनी मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले. मात्र, सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे का मंत्रिमंडळ विस्तार करण्याची? अशी विचारणा त्यांनी केली.
या सरकारचं काय चाल्लंय, छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात. सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत.त्यांना लाज लज्जा शरम आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराजरक्षक संबोधून मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.
साखर धोरणावर सडकून टीका
केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सडकून टीका केली. केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशच्या फायदा केला. आम्ही ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला, तर राज्याच्या शेतकऱ्यांना 600 रूपये अधिकचा दर मिळेल, पण आमच्या शेतकऱ्यांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या