कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडच्या आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली.

सांगली: प्रेमसंबंधातून अनेकदा वाद निर्माण होऊन गंभीर गुन्हे घडल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामध्ये, अनैतिक संबंधातून होत असलेल्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यातच, आता कराड (Sangli) शहरातील आगाशिवनगर येथे एका 45 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, आरोपी महिलेस पोलिसांनी (Police) अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
कराडच्या आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली. प्रियकर संशय घेत असल्याने प्रेयसीने खून केल्याची प्राथमिक माहिती कारण समोर येत असून घटनेतील आरोपी महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मरीआप्पा काळे (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी असे ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
कोल्हापुरात पतीकडून पत्नीचा खून
पतीने मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. स्वाती गणेश हुबाळे असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून मारहाणीचा प्रकार आठवड्यापूर्वी झाला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. गणेश शंकर हुबाळे असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
























