Jaigad Fort : जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला, JSW कंपनी जबाबदार? अधिकाऱ्यांच्या जबाबातून कारण समोर
Jaigad Fort : रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचे व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर फिरत होते.

Jaigad Fort : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचे व्हिडीओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर फिरत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली. यावेळी संपूर्ण प्रकरण आणि बुरुज ढासळल्याचं कारण जाणून घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पंचांनी जेएसडब्ल्यू (JSW) या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उत्तर दिलंय, जाणून घ्या
रत्नागिरीतील जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला, जबाबदार कोण?
समुद्रात साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावरती होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचा जबाब JSW च्या काही अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी यांना लिहून दिला आहे. ज्यात त्यांनी म्हटंलय, ''किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. त्याला कंपनीचं ड्रेझिंग जबाबदार आहे. पण याबाबतचा कोणताही अहवाल किंवा विचारणा आम्हाला झालेली नाही. त्यामुळे याबाबत अहवाल मिळेल किंवा विचारणा केली जाईल त्यावेळी अधिकृतपणे याला आम्ही उत्तर नक्की देऊ." मंडळ अधिकारी यांच्याकडून हा जबाब अर्थात ही पंचयादी आज तहसीलदारांना दिली जाईल. त्यानंतर तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे हा जबाब सादर करून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. पाच ते सहा महिन्यांपूर्वी जेट्टीचे काम सुरू झाले. त्यानंतरच हा बुरुज ढासळण्यास सुरुवात झाल्याचं या पंचांचं म्हणणं आहे. जयगड गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक आणि पुरातत्व विभागाकडून जयगड किल्ल्याची देखभाल करण्यासाठी नेमण्यात आलेली व्यक्ती असा चार जणांचा या पंचयादीत समावेश आहे.
समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे बुरूज ढासळला?
किल्ल्याचे बांधकाम शेकडो वर्षे जुने आहे. शिवाय, बुरुजावर झाडे देखील उगवलेली आहेत. त्यामुळे बुरुज ढासळला असावा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. पण त्यानंतर आता समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे पंचांचं म्हणणं आहे. यानंतर आता अभ्यासक असतील किंवा तज्ज्ञांकडून अधिक सखोल अभ्यास केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान किल्ल्याचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजे. त्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशी मागणी दुर्ग प्रेमी आणि जिल्हावासियांकडून केली जात आहे. दरम्यान, जयगड हा किल्ला केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे देखभालीसाठी देण्यात आलेला आहे. त्यावर JSW या कंपनीचे म्हणणं काय? किंवा कंपनीची बाजू काय? हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा>>>
Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील लढाई चुरशीची, नारायण राणेंच्या विजयासाठी हे दोन फॅक्टर्स ठरणार निर्णायक
























