एक्स्प्लोर
सर्वांची संमती, मग मराठा आरक्षण अडलंय कुठं?: उदयनराजे
मराठा समाजाचा धमाका झाल्यास जबाबदार कोण?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असं उदयनराजे म्हणाले.
पुणे: मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही तर मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही? 58 मूक मोर्चे निघाले पण तरीही मराठा आरक्षण लांबवलं. त्याचवेळी तातडीने पावलं उचलली असती, तर आज अनेकांचे जीव गेले नसते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असं उदयनराजे म्हणाले.
मराठा आरक्षण परिषद
मराठा आरक्षण परिषद या नावाखाली सर्वांना एकत्र करु. सर्वांचे विचार घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मी नेता म्हणून, खासदार म्हणून नाही तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेन, असं उदयनराजे म्हणाले.
30 वर्ष आरक्षण देणार नाही असं तरी सांगा
मराठा मोर्चे थांबले पाहिजेत म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे आहेत. सत्ताधारी-राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी. नाहीतर आरक्षण लांबणार आहे किंवा देणार नाही, असं तरी एकदा सांगून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका, असा उपहासात्मक टोला उदयनराजे भोसलेंनी लगावला.
कोणाशी जोडू नका
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कोणत्याही अन्य मुद्द्याशी जोडू नका, ना राजकारण, ना अन्य समाजाशी तुलना नको, असं ते म्हणाले.
आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय? दरोडा, खुनाच्या केसेस. सरकारने मराठा आंदोलकांवरील केस तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा त्याचा भडका होईल, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही, असा इशारा त्यांनी दिला.
..तर जीव गेले नसते
मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. कायदे कोणी बनवले? माणसानेच ना? मग लोकशाहीतील लोकांसाठी घटना वगैरे कशाला पाहता? मराठा समाजावर अन्याय होतोय तर त्यांना आरक्षण द्यायला हवं, असं उदयनराजे म्हणाले.
ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी, असा सल्ला त्यांनी राजकारण्यांना दिला.
जी तत्परता अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वपक्षांनी दाखवली, तिच तत्परात मराठा आरक्षणाबाबत का नाही? सर्वांची संमती आहे तर मग मराठा आरक्षणाला विलंब का? असे सवाल उदयनराजेंनी उपस्थित केले.
टोलवाटोलवी किती?
या सरकारने त्यांच्याकडे, त्यांनी यांच्याकडे अशी किती वर्ष टोलवाटोलवी करणार? 25-30 वर्ष झाली या टोलवाटोलवीला. आता बास करा. एकमेकांकडे बोट दाखवणं बंद करा. उद्या धमाका झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी विचारला.
मेल्यावर नोकरी कशाला?
प्रत्येक कुटुंबातील एकाने आत्महत्या करावी, मग त्याला तुम्ही नोकरी देणार आणि त्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होणार, असा तुमचा प्रस्ताव आहे? अशी विचारणा उदयनराजेंनी केली.
58 मोर्चे निघाले, सर्वांनी दखल घेतली. आश्वासन दिलं. मग नंतर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तो प्रश्न तेव्हाच हाताळला असता तर आज जीव गेले नसते. तुम्ही लोकांची भावना समजून घ्या. आरक्षणाच्या मुद्द्याकडे तुम्ही राजकारणाशी, समाजाशी जोड देऊ नका. सत्तेत आणि विरोधात असलेल्यांनी माणुसकीच्या नात्यातून हा मुद्दा समजून घ्यावा. प्रत्येक नेत्याला जाणीव हवी. तुमच्याकडे जाणीव आहे तर मग हा प्रश्न मार्गी का लागला नाही, अशी विचारणा त्यांनी केली.
मार्ग काढायला इतका वेळ का?
तुम्ही मार्ग काढू म्हणता, पण इतकी वर्ष मार्ग निघाला नाही, त्यामुळेच तर मोर्चे निघालेत. लोकांसमोर पर्याय नसल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पण त्यांना काय मिळालं? दरोडा, खुनाच्या केसेस. शेकडो केसेस अंगावर घालणं हा कुठला न्याय? या केसेस मागे घ्या, अन्यथा भडका उडेल. यांना भडकवणारं कोणी नसेल, पण यांना थांबवणार कोण?
परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, आताच मार्ग काढा. हा प्रस्ताव लोकसभा, मग राज्यसभा, मग राष्ट्रपती तोपर्यंत मग आचारसंहिता येणार.. तुम्ही किती वेळ लावणार? आधीच 30 वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे.
जोपर्यंत कायदा करत नाही, तोपर्यंत तुमच्या अध्यादेशाचा उपयोग काय? लोक आम्हाला विचारतात मग आम्ही त्यांना काय उत्तर देऊ?.
दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढा असं आम्ही म्हणत नाही. जसं त्यांना दिलंय, तसंच मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उदयनराजेंनी केली.
घटना बनवली कुणी?
घटना दुरुस्ती बिरुस्ती जाऊद्या, घटना बनवली कुणी? माणसांनीच ना? कायदे बनवले कुणी? लोकप्रतिनिधींनीच ना? कायद्यात दुरुस्ती कधी होते? तुम्हीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच ना? लोकशाहीतले राजे कायदे बनवू शकतात, दुरुस्त करु शकतात, मग मराठा आरक्षणाबाबतच मागे का? असा सवाल उदयनराजेंनी विचारला.
VIDEO:
ABPMAJHALIVE : उदयनराजेंची पत्रकार परिषद https://t.co/EJeJ3fggJP
— ABP माझा (@abpmajhatv) August 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement