(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sasoon Hospital Drug Racket : ससूनची चौकशी समिती म्हणजे फार्स, निवृत्त न्यायमुर्तींनी चौकशी करावी; आमदार रविंद्र धंगेकरांची सरकारवर टीका
ड्रग्ज प्रकरणी ससूनची चौकशी समिती म्हणजे कारवाईचा आणि चौकशीचा फार्स असल्याचा आरोप कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
पुणे : ड्रग्ज प्रकरणी ससूनची (Sasoon Hospital Drug Racket) चौकशी समिती म्हणजे कारवाईचा आणि चौकशीचा फार्स असल्याचा आरोप कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससूनमधून पळून गेल्यानंतर ससूनच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांनी राज्य सरकारकडून या प्रकरणात ससूनच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चौकशीसाठी ससूनच्या डीनच्या समकक्ष आधिकारीच नियुक्त केल्याने तो आपल्या सहकाऱ्याची चौकशी कशी करणार? असा प्रश्न आमदार धंगेकरांनी उपस्थित केला. या प्रकरणाची निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने बुधवारी ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाच्या आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी संदर्भात एक पत्र काढून चौकशी समिती नेमली आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये एक अधिकारी आणि दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलने पलायन केल्यानंतर ससून रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला होता. देशभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली आहे. परंतु ही समिती हा केवळ चौकशीचा फार्स असून या मधून काहीही साध्य होणार नाही, असे धंगेकर यांनी मुखमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे अतिशय गंभीर प्रकरण असून यामध्ये अनेक बडे मासे गुंतले आहेत. ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या आशीर्वादाने ललित पाटील अनेक दिवस ससून रुग्णालयाचा पाहुणचार घेत होता. या ठिकाणाहून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यामुळे या प्रकरणात दोषी डॉक्टरावर ही चौकशी समिती कारवाई करू शकणार नाही. किंबहुना या डॉक्टरांना वाचवण्याचे काम ही समिती करू शकते. त्यामुळे हा प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करावी अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्याकडे केली आहे.
ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात
ड्रग्स माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र, डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला होता. डीननी माहिती न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
इतर महत्वाची बातमी-
Lalit Patil : पुणे पोलिसांनी चालवलंय तरी काय? ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा 'कोठडी'तला व्हिडीओ समोर...