Rupali Chakankar In Pune: सत्यवानाची सावित्री कळली मात्र जोतीबाची कधी कळणार: रुपाली चाकणकर
वडाची पुजा करणारी सत्यवानाची सावित्री जशी आम्हाला समजली मात्र स्वत:च्या अंगावर शेणाचे शिंतोडे उडवून घेणारी जोतिबाची सावित्री मात्र आम्हाला समजली नाही हिच आपल्या समाजाची शोकांतिका आहे.
Rupali Chakankar In Pune: वडाची पुजा करणारी सत्यवानाची सावित्री जशी आम्हाला समजली मात्र स्वत:च्या अंगावर शेणाचे शिंतोडे उडवून घेणारी जोतिबाची सावित्री मात्र आम्हाला समजली नाही हिच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. जोतिबांच्या सावित्रीचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. मात्र या संघर्षाला सावित्रीबाई सामोरे गेल्या म्हणून मी आज माझं मत मांडू शकत आहे, असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
माझा आणि वटपोर्णिमेचा फार संबंध आला नाही. लग्नानंतर एकदाही मी वडाची पुजा केली नाही. मी माझ्या साहेबांना सांगते, की मीच हवी असेल तर तुम्ही वडाला फेऱ्या मारा. माझ्याकडून वडाची पुजा होणार नाही. माझ्या पतीनेदेखील मला कधी आग्रह केला नाही. माझ्या कुटुंबीयांनीदेखील मला तसा आग्रह केला नाही. उलट माझ्या पतीने माझ्या भावना समजून घेतल्या, असंही त्या म्हणाल्या.
वडाची पुजा करताना निसर्गाचा आणि पर्यावरणाचाही विचार महिलांनी करायला हवा. वडाच्या झाडापासून ऑक्सिजन जास्त मिळतो. त्यामुळे वडाचं झाडदेखील लावा हा संदेश दिला. मात्र दुर्दैवाने वटपोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा वाडाचं झाड बघतो तर झाड झुकलेल्या अवस्थेत दिसतं. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लोकांकडून त्या झाडाला या बंधनातून मुक्त करताना दिसतात, असं म्हणत त्यांनी सगळ्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
ज्या महिला माझ्याकडे पतीने मारहाण केली किंवा दारु पितो अशी तक्रार घेऊन येतात. त्याच महिला मला वटपोर्णिमेला पुजा करताना दिसतात. त्यावेळी त्यांचं उत्तर असतं की कुटुंबीयांच्या किंवा सामाजाच्या लाजेखातर ही पुजा करावी लागते. समाज काय म्हणेल याचा विचार आपण आधी करतो आहोत. मात्र आपला पती कसा आहे. त्या पतीमध्ये कशी सुधारणा घडवून आणता येईल, याकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे मारहाणीचे आणि अत्याचाराचे प्रकार सातत्त्याने सुरु आहेत. ज्यादिवशी समाजाचा विचार करुन महिला स्वत:त सुधारणा घडवून आणेल त्यादिवशी खरी सावित्री जागी होईल, असंही त्या म्हणल्या.