Chinchwad Assembly constituency: चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या राहुल कलाटेंचं ठरलं?, आता मविआत लावली फिल्डिंग, तुतारी फुंकणार की मशाल पेटवणार?
Chinchwad Assembly constituency: चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. अशातच चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक त्यांनी चिन्हावर लढायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली असून लवकरचं त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. फक्त ते हाती तुतारी घेणार की मशाल हाती घेणार, याबाबतची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
काय म्हणालेत राहुल कलाटे?
शरद पवारांच्या गटातील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या संपर्कात असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. कलाटेंनी तुतारी फुंकावी यासाठी खासदार अमोल कोल्हे चांगलेच आग्रही असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीवेळी अजित पवारांनी केलेल्या खेळीचा अनुभव पाहता, पुन्हा तसाच दगाफटका होऊ नये. म्हणून कलाटे आस्ते कदम टाकताना दिसत आहेत. पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती झालीच तर पुन्हा अपक्ष नशीब अजमावण्याची तयारी कलाटेंनी (Rahul Kalate) केली आहे.
एबीपी माझाशी बोलताना राहुल कलाटे म्हणाले, गेल्या दोन ते तीन वेळा मी निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर गेलो आहे. जनतेने मला मोठं प्रेम दिलं. मला दोन वेळा अपक्ष लढावं लागलं, कारण हा मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यामुळे माझ्याकडे त्यावेळी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सध्या मी चिंचवड विधानसभेतील नागरिकांशी चर्चा करतोय, भेटीगाठी, वेगवेगळे कॅम्प, सुरू आहे, अशातच मला जर यावेळी लढताना कोणत्या पक्षांची साथ मिळाली, तर मी खूप मोठ्या फरकाने निवडून येईल असंही कलाटेंनी (Rahul Kalate) म्हटलं आहे.
कोल्हेंबाबत बोलताना म्हटले, माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्यांला ताकद देण्याचं काम कोण करत असेल तर ते माझ्याकडून स्वागतार्ह आहे, यावेळी मी निवडणुकीच्या माध्यातून जनतेसमोर जाईन. मी अपक्ष जाईल किंवा माझ्यामागे कोणी आपली ताकद उभी करेल ते येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असंही राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे. दोन निवडणुकींमध्ये मला अपक्ष लढावं लागलं, भाजपकडे मतदारसंघ गेला त्यामुळे मला अपक्ष लढावं लागलं, पण, यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती, मी यावेळी देखील निवडणूक लढणार आहे, मी पक्षाच्या चिन्हावर लढेन किंवा अपक्ष लढेन, ते लवकरच स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर ते बोलताना म्हणाले, ज्या मतदारसंघात ज्या उमेदवाराची तळागाळापर्यंत ताकद आहे, त्याचा विचार या निवडणुकीवेळी पक्ष आणि नेते करतील आणि त्यांना संधी देतील अशी आशा देखील यावेळी एबीपी माझाशी बोलताना चिंचवडचे इच्छुक उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate)यांनी व्यक्त केली आहे.