Pune News : अभाविप अन् मनसे चित्रपटसेनेच्या मागणीला यश; अखेर विद्यापीठानं भूमिका मांडली
पुणे विद्यापीठात नाटकावरुन झालेल्या राड्यावर पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये, अशी भूमिका विद्यापीठाने स्पष्ट केली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरुन झालेल्या राड्यावर (Savitribai Phule Pune University) विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे तसेच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णतः गैर असून निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करीत आहे, अशा शब्दांत विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यासोबतच नाटकावरुन झालेल्या बाचाबाचीनंतर पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये, अशी भूमिका विद्यापीठाने स्पष्ट केली आहे.
मनसे चित्रपट सेना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला यश
मनसे चित्रपट सेना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला यश आलं आहे. नाटकावरुन झालेल्या राड्यानंतर दोन्ही संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दोन्ही संघटनांनी थेट कुलगुरुंना भेटून योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. मनसे चित्रपटसेनेचे पुणे शहराध्यक्ष चेतन धोत्रे आणि कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा निषेध करत विद्यापीठाला जाब विचारला होता. त्यानंतर विद्यापीठाने पत्रक काढत प्रकरणी विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
विद्यापीठानं नेमकं काय म्हटलं आहे?
नाटकावरुन झालेल्या बाचाबाचीनंतर पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये ही विद्यापीठाची भूमिका आहे.या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याबाबत विद्यापीठाकडे विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे तसेच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णतः गैर असून निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करीत आहे. सदर प्रकरणी विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात विहित नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचं विद्यापीठाने सांगितलं आहे.
डॉ. प्रविण भोळे यांच्यासह पाच विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी
पुणे विद्यापीठात नाटकावरुन झालेल्या राड्यानंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्यास सहा जणांना नाटकाबाबत अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि डॉ. प्रविण भोळे यांच्यासह आरोपी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीना न्यायालयीन कस्टडीत घेतले असून आरोपीनी जमीन अर्ज केला होता. या जामीन अर्जाला अॅड. शिवम पोतदार, अॅड. अक्षय वाडकर, अॅड. सोनाली कांचन यांनी विरोध केला असून अॅड. शिवम पोतदार यांनी नाटक जाणीवपूर्वक हिंदू धार्मिक भावना दुखविण्याच्या हेतूने दाखवले गेले आणि यात काही प्रतिबंधित संघटनांचा यात समावेश असल्याचा आणि दंगल उठविण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : ललित कला केंद्रात शाईफेक अन् तोडफोड; नाटकावरुन अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक