मोठी बातमी : BlaBlaCar अॅपचे पिक पॉईंट शोधून कारवाई करा, परिवहन विभागाचा फतवा, प्रवाशांचं टीकास्त्र
BlaBlaCar Pune: ब्लाब्ला कार अॅपचे पिक पॉईंट शोधून कारवाई करा, असा फतवा परिवहन विभागाने काढला आहे.
पुणे: एरवी एकट्यासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्लाब्ला (BlaBlaCar Pune) ॲपेने उपलब्ध करून दिली होती. मुंबई पुणे नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती. त्यातच पैशांची, इंधनाची आणि सोबतच वेळेची बचत अशा कारणांमुळे अल्पावधीत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्याला प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणावर मिळाला होता. पण आता परिवहन विभागाने नवा फतवा काढत ब्लाब्ला कारचे (BlaBlaCar Pune) पिकअप पॅाईंट शोधून त्यावर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यासाठी अगदी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अश्या सूचना ही दिल्या आहेत. मात्र या आदेशावरून परिवहन विभागावर टीका सुरू झाली आहे. खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहतूक दारांकडून मिळणारा मलिदा हाच खरा या आदेशामागचा उद्देश आहे, अशी टीका प्रवाशांकडून केली जाते आहे. (BlaBlaCar Pune)
परिवहन विभागाने दिलेल्या आदेशात काय म्हटलंय?
BlaBlaCar आणि तत्सम अॅप्सद्वारे खाजगी वाहनांचा व्यावसायिक वापर करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनधिकृत प्रवासी वाहतुकीची तपासणी व त्यावर कारवाई करण्यासाठी रस्ता सुरक्षा पथक क्रमांक १ ते ६ यांना पुढीलप्रमाणे तपासणीसाठी तैनात करण्यात येत आहे.
तपासणीचे ठिकाण आणि वेळ :
नवले ब्रिज
चांदणी चौक
स्वारगेट
पुणे स्टेशन
हडपसर
येरवडा
नगर रोड
वाहने तपासणे :
१) BlaBlaCar आणि तत्सम अॅप्सद्वारे बुकिंग केलेली खाजगी वाहने थांबवून त्यांची तपासणी करावी.
२) वाहन चालकाचे नाव, वाहन क्रमांक आणि वाहन प्रकार याची नोंद ई-चलनवर करावी.
३) वाहन चालकाकडे वाहनाचे विमा, नोंदणी प्रमाणपत्र, पियुसी, अनुज्ञप्ती, परवाना आणि योग्यता प्रमाणपत्र.
४) प्रवाशांची यादी तयार करावी (नाव, वय, बोर्डिंग पॉइंट, ड्रॉप पॉईंट, भाडा).
५) तपासणीसाठी BlaBlaCar किंवा तत्सम अॅप्सद्वारे खाजगी प्रवासी म्हणून बुकिंग करता येईल.
६) पेमेंट पद्धती आणि वाहनाचा प्रवासी वाहतुकीसाठी व्यावसायिक वापर असल्याचा पुरावा गोळा करणे (ऑनलाईन व्यवहार, रसीद, इ.).
७) खाजगी वाहनांचा व्यावसायिक उपयोग असल्यास ६६/१९२ (अ) अन्वये कारवाईसाठी प्रकरण नोंदवणे. आवश्यक असल्यास वाहन जप्त करणे.
८) आवश्यक असल्यास वायुवेग पथकाने गुप्त प्रवासी बनून तपासणी करावी.
प्रत्येक शुक्रवारी तपासणीचा सविस्तर अहवाल सादर करावा. अहवालामध्ये गोळा केलेले पुरावे, प्रवाशांची यादी आणि केलेल्या कारवाईचे तपशील नमूद कराव्यात. ही मोहीम BlaBlaCar आणि तत्सम अॅप्सच्या माध्यमातून खाजगी वाहनांच्या व्यावसायिक उपयोगामुळे होणारे कायद्याचे उल्लंघन थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आदेशाचे तंतोतंत पालन करून वेळेवर अहवाल सादर करावा, असे प्रशासनाकडून दिलेल्या पक्षात म्हटलं आहे.