Pune Crime News: खिशात हात घातला अन् वादाला तोंड फुटलं, ब्लेडने एकापाठोपाठ सपासप वार, पुण्यातील गोल्डन ज्युबिली चौकात काय घडलं?
Pune Crime News: ही घटना पुण्यातील भवानी पेठ परिसरात घडली आहे. वार झालेला सुशील थोरात गंभीर जखमी झाला आहे.

पुणे : पुण्यात क्षुल्लक कारणास्तव एका तरूणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फक्त खिशात हात घातल्याच्या कारणातून झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशील अजिनाथ थोरात (वय 26, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानी पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भरत ऊर्फ हरिश मोरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना कासेवाडी येथील गोल्डन ज्युबिली चौकात सोमवारी पहाटे 6 वाजता घडली आहे.
फिर्यादी सुशील त्याचे मित्र अनिकेत यादव, अभिजित जाधव हे विश्रांतवाडी येथील भीमजयंती कार्यक्रम पाहून पहाटे आले होते. गोल्डन ज्युबिली चौकात ते गप्पा मारत थांबले असतानाच त्यांच्या तोंडओळखीचा आरोपी मोरे हा तेथे आला. त्याने सुशीलच्या खिशात हात घातला. तेव्हा सुशीलने त्याला ढकलून दिल्याने जमिनीवर पडला. त्याने उठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मला खाली कसा काय पाडलं? आता तुला मारूनच टाकतो, असे म्हणून त्याने त्याच्या जवळ असलेलं ब्लेड काढून सुशीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुशीलच्या गळ्यावर जोराने वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला.
भरतने सुशीलच्या कानावरती, हातावरही वार केले. त्याचे मित्र व जाणारे-येणारे लोक त्याच्या मदतीला आले. तेव्हा भरत मोरे याने लोकांनाही धमकावत कोणी वाचवायला आले, तर सर्वांचे तुकडे करून टाकेन, असं म्हणत लोकांना धमकावलं. त्यामुळे लोक पळून गेले. त्यानंतर सुशीलच्या दोन मित्रांनी धाडस करून त्याला धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पळून गेला. त्यानंतर सुशीलला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. खडक पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन सुशीलची फिर्याद घेतली असून, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत.























