'No Means No', मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी मदत मागणाऱ्या तरुणाला पुणे पोलीस आयुक्तांचे उत्तर
पुणे पोलिस #LetsTalkCPPuneCity गेल्या काही दिवसांपासून शहरात राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

पुणे : मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी एका व्यक्तीने ट्विटरवर चक्क पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे मदत मागितली आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांनी हा प्रश्नही टाळला नाही. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, No Means No सांगत मुलीच्या इच्छेविरोधात काहीच होऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता #LetsTalkCPPuneCity मोहिमेअंतर्गत ट्विटरवर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. या वेळी एका तरुणाने चक्क आयुक्तांकडे मुलीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी मदत मागितली. गुप्ता आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, दुर्दैवाने मुलीच्या इच्छेविरोधात आम्हीदेखील काही मदत करु शकत नाही. तिच्या इच्छेविरोधात तू देखील काही करु नये. जर एखाद्या दिवशी तिने होकार देण्याची तयारी दाखवली तर तुला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. नाहीचा अर्थ नाही होतो. अमिताभ गुप्ता यांनी या वेळी #NoMeansNo हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
पुणे पोलिस #LetsTalkCPPuneCity गेल्या काही दिवसांपासून शहरात राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच नागरिकांच्या पोलिसांकडून काय अपेक्षा आहे, हे देखील समजून घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
