Maharashtra News : सुषमा अंधारे आज संजय शिरसाट यांच्याविरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
Maharashtra News : सुषमा अंधारे आज आमदार संजय शिरसाट यांच्यावर तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
Maharashtra News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आज शिवसेनेचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजता पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुषमा अंधारे यांच्यावतीने हा दावा दाखल केला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सुषमा अंधारे संजय शिरसाट यांच्यावर केवळ तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात संजय शिरसाट यांची जीभ घसरली
आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे या त्यांच्या अनेक सभेतून विरोधकांवर जहरी टीका करत असतात. अनेक भाषणात त्या आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. त्यावरुन संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु यावेळी संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांची जीभ घसरली होती.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु
सुषमा अंधारे यांच्यावर भाषणामध्ये अपशब्द वापरल्याच्या प्रकरणील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली. महिला आयोगाच्या निर्देशानंतर तपासणी सुरु आहे. यूट्यूबवर उपलब्ध असलेलं संजय शिरसाट यांचं भाषण तपासलं जाणार आहे. तक्रारीमध्ये पुरवलेल्या भाषणाचीही तपासणी सुरु आहे. तसंच 'लफडं' हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का याचीही चौकशी केली जात आहे, अशी माहिती एबीपी माझाला पोलीस सूत्रांनी दिली आहे.
...तर तात्काळ राजीनामा देतो : संजय शिरसाट यांचं आव्हान
एकीकडे संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असतानाच या सर्व आरोपांवर संजय शिरसाट यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द 'अश्लील' बोलल्याचा दाखवा, मी तात्काळ राजीनामा देतो, असं शिरसाट यांनी म्हटलं. माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचं सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले. तर महिलेचा अपमान झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण जर महिला आहे तर महिलेसारखं बोललं पाहिजे. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना देखील शिव्या दिल्या. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अशाप्रकारे शिव्या देण्याचं कंत्राट यांना कोणी दिले आहे. महिला म्हणून आम्ही काहीच बोललोच नाही, पण त्याचा बाऊ करण्यात आला. यांची पार्श्वभूमी जर पहिली तर यांनी आत्तापर्यंत काय-काय बोलले याची रेकॉर्डिंग आहे, असेही शिरसाट म्हणाले.