Helicopter crash : माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
जिल्ह्यातील या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या घटेननंतर सोशल मीडियावर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
पुणे : जिल्ह्यातील पौडजवळ आज हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप बचावले आहेत. या दुर्घटनेत पायलट जखमी झाल्याची माहिती असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगावधान दाखवत येथील एका शेतात ते उतरवण्याचा प्रयत्न केल्याने इमर्जन्सी लँडींग शक्य झाले, पण ते हेलिकॉप्टर क्रॅश होऊन शेतात कोसळले. देव तारी, त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्ययचं या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून आला आहे. कारण, बघता बघता एका क्षणात हे हेलिकॉप्टर खाली कोसळले आणि त्याचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र, सुदैवाने सर्वच प्रवासी बचावले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने किंवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वी तेथील एका हॉटेलमधील वेटर देवदूत बनून घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावरील हेलिकॉप्टरमधू जखमींना बाहेर काढून त्यांना सुरक्षीत ठिकाणी बसवले.
जिल्ह्याच्या मुळशी (Mulshi) तालुक्यातील कोंढावळे गावात हेलिकॉप्टर (Helicopter crash) कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर गावालगत असलेल्या गारवा वाटाणे मळा या हॉटेलमधील सगळे वेटर्स हातातील काम टाकून पळत सुटले, त्यांनी थेट कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घटनास्थळ गाठून दुर्घटनेतील चार जणांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आयुष्याच्या संघर्षमय प्रवासात दररोज वेटर्सच काम करणारे ही सगळी मंडळी आज दुर्घटनेतील चार जणांसाठी देवदूत ठरले आहेत. अशा अपघातस्थळी किंवा दुर्घटनाग्रस्त ठिकाणावर प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा व ट्रेनिंग असलेली रेस्क्यू टीम तत्परतेने काम करते. मात्र, या रेस्क्यू टीम पोहोचवण्यापूर्वीच या वेटर्सने घटनास्थळी जाऊन दुर्घटनेतील चारही जणांना बाहेर काढून प्रथमोपचार केले. तसेच, अपघातग्रस्तांना (Accident) धीर देण्याचं काम केलं, त्यामुळे कुणीतरी आपली काळजी घेत असल्याचा विश्वास त्यांना मिळाला. दरम्यान, जिल्ह्यातील या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या घटेननंतर सोशल मीडियावर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
या सर्वांनी केली मदत
दरम्यान, या अपघात दुर्घटनेनंतर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांसह सर्वच स्टाफ घटनास्थळी गरजेचं साहित्य घेऊन धावले. त्यामध्ये, संगीता वाटाणे, मनोहर वाटाणे, रसिक वाटाणे, रोहितवाटाणे, ओंकार भोर
शिवा येंगडे, राजू वावले, मारूतीदगडे, सुरेश यमगर, मिथिलेश पासवान, इक्रम अन्सारी, श्रीनाथ धुमाळ या सर्वांनी मदतीसाठी योगदान दिले.
हेही वाचा
देव तारी त्याला कोण मारी, क्षणात हेलिकॉप्टर कोसळलं; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
मी जळगावात येतोय, 11 लखपती दीदींना प्रमाणपत्र देणार; नरेंद्र मोदी प्रतिभाताईंना भेटणार