Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम विधानसभा मतदारसंघात आता भाजपकडून मनसेच्या अमित ठाकरे यांना पडद्यामागून रसद पुरवली जाणार का, हे पाहावे लागेल.
मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. या मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे रिंगणात उतरले आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने महायुतीमधून त्यांच्याविरोधात उमेदवार नको, असा सूर भाजपच्या काही नेत्यांकडून आळवला जात होता. यामध्ये प्रसाद लाड, नितेश राणे, आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा समावेश होता. राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या मुलाविरोधात उमेदवार नको, अशी भाजप नेत्यांची भूमिका होती. परंतु, सदा सरवणकर यांनी ठाम राहत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास नकार दिला होता.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होईल, अशी चिन्हं दिसत होती. मात्र, सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचे दिसले. सुरुवातीला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आमचा पाठिंबा हा सदा सरवणकर यांनाच असेल, असे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांच्याशी उत्तम वैयक्तिक संबंध असलेल्या आशिष शेलार यांनीही घुमजाव केले. त्यांनी म्हटले की, महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला आहे. महायुतीचे उमेदवार आता सरवणकरच आहेत आणि महायुतीचा उमेदवार तोच आमचा उमेदवार, अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली. मात्र, महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माहीमबाबत चर्चा करुन वेगळा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी, असेही शेलार यांनी म्हटले. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात आगामी काळात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपच्या नेत्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपची मते कुठे जाणार, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांचे भाजपच्या अनेक नेत्यांशी उत्तम वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेला पडद्यामागून गुप्तपणे रसद पुरवली जाणार का, हेदेखील पाहावे लागेल. याशिवाय, आशिष शेलार यांनी माहीममध्ये सदा सरवणकर यांना पाठिंबा देण्याची भाषा केल्याने त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील मनसेची मते कोणाकडे वळणार, हेदेखील पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
आणखी वाचा
राज ठाकरेंनी सदा सरवणकरांना घरातही घेतलं नाही, मुलाकडून संदेश पाठवला, तुम्हाला लढायचं तर लढा