मी जळगावात येतोय, 11 लखपती दीदींना प्रमाणपत्र देणार; नरेंद्र मोदी प्रतिभाताईंना भेटणार
लखपती दीदी (Lakhpati didi) हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून या योजनेद्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला युक्रेन दौरा आटपून मायदेशी परतल्यानंतर थेट महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम आयोजित केला असून राज्यातील 11 लाख महिलांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकारने लखपती दीदी ही नवीन योजना सुरू केली असून राज्यात या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. स्वत: नरेंद्र मोदींनी ट्विट करुन मी उद्या जळगावात येत असून 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल, असे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदींचा जळगाव दौरा असल्याने जिल्ह्यात सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जात आहे. तसेच, राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यात संतापाची लाट आहे, त्या पार्श्वभूमीवरही खबरदारी घेतली जात आहे.
लखपती दीदी (Lakhpati didi) हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून या योजनेद्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लखपती दीदी योजनेस पात्र असलेल्या महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आता, या योजनेची राज्यातील सुरुवात तब्बल 11 लाख महिलांना प्रमाणपत्र देऊन करण्यात येत आहे. त्यासाठी, नरेंद्र मोदी (Narendra modi) उद्या जळगाव दौऱ्यावर आहेत.
''लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी, उद्या, 25 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे'', असे मराठीत ट्विट मोदींनी केले आहे. दरम्यान, 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती.
दीदीच्या पापड उद्योगाची माहिती घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी या कार्यक्रमातून देशभरातील 100 महिला लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात, जामनेरमधील शिंगाईतच्या प्रतिभा पाटील यांचा समावेश आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देण्यासाठी राज्यभरातील 12 महिलांसाठी स्वतंत्रपणे 'कुटी' उभारण्यात येणार आहेत. या कुटींच्या माध्यमातून शिंगाईतच्या (जामनेर) पापड उद्योगातील 'लखपती दीदी' पंतप्रधानांना अस्सल खान्देशी स्वाद भरवणार आहेत. प्रतिभा अर्जुन पाटील असे या लखपती दीदीचे नाव आहे. पंतप्रधानांच्या भेटीत त्या पापडाचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. यावेळी भाजलेला पापड मोदींना भरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रोहित पवारांनी ट्विट केलं पत्र
महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना प्रचंड वाढल्या असून याकडे राज्यसरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय. वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यात गृहविभागाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. साहेब, आपण उद्या महाराष्ट्रात येत आहात, आपल्याला ही परिस्थिती ज्ञात करून देण्यासाठी हे पत्र लिहीत आहे, असे म्हणत राज्यातील महिलाअत्याचाराच्या घटनांवरुन रोहित पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
हेही वाचा
देव तारी त्याला कोण मारी, क्षणात हेलिकॉप्टर कोसळलं; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ