Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
कोल्हापूर उत्तर या जागेवरून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर तेथे अनेक घडामोडी घडल्या.
कोल्हापूर : काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे (Madhurima Raje) यांनी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतल्यानंतर कोल्हापुरात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. मधुरिमाराजे यांच्या या निर्णयानंतर कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माघारच घ्यायची होती, तर मग निवडणुकीला उभे कशाला राहायचे, असे सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले. सोबतच सतेज पाटील यांनी त्यांची ही नाराजी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्यापुढे बोलून दाखवली. यावरच आता भाजपाचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी प्रतिक्रिया दिली. शाहू महाराज यांचा सतेज पाटील यांनी अवमान केला आहे, असा दावा महाडिक यांनी केला आहे.
अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचं धाडस कोणीही केलं नव्हतं
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शाहू महाराज हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत, अशी बातमी आल्याचं मला सोशल मीडियावर समजलं. ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा अवमान झाला आहे, तो कोणीही सहन करणार नाही. कोणीही आजपर्यंत कोल्हापूरच्या राजघरणाविषयी अशा पद्धतीने भाषा किंवा अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचं धाडस कोणीही केलं नव्हतं. मात्र सतेज पाटील हे स्वत:ला सर्वोच्च समजत आहेत. त्यांनी महाराजांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांविषयी अर्वाच्य भाषेत वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे महाराजांचं मन दुखावलं असेल. हे वेदनादायी आहे. दुखद आहे. कोल्हापूरवासी हे सहन करणार नाहीत.
सतेज पाटील एवढे मोठे झाले का?
"शाहू महाराजांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही नाही. राहुल गांधी यांनी घोषित केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर, सतेज पटील यांच्यावर आली आहे. हे सगळं झाल्यानंतर आम्ही टीव्हीवर जे दृश्य पाहिलं ते अतिशय मन हेलावून टाकणारं आहे. ज्या महाराजांना सहा महिन्यांपूर्वी गादीचा मान, गादीचा मान सांगत शाहू महाराजांसाठी मतं मागत होते. आज त्याच महाराजांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना बोलत होते. सतेज पाटील एवढे मोठे झाले का, की ते राज घरणाऱ्यावर बोलायला लागले आहेत," अशी टीकाही महाडिक यांनी केली.
कोल्हापूरकर राजघराण्याचा अवमान सहन करणार नाहीत
"आज जे चित्र निर्माण झालं आहे, ते कोल्हापूरकरांनी पाहिलं आहे. कोल्हापूरकर राजघराण्याचा अवमान सहन करणार नाहीत. आज कोल्हापूर उत्तरमध्ये जे घडलं, त्याचा परिणाम कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकनंगले, शिरोळ या पाचही जागांवर पडणार आहे. या पाचही जागांवर काँग्रेसचा सुपडा साफ होणार आहे. या ठिकाणी भाजपाचा आलेख दहा विरुद्ध शून्य असा होईल, अशी परिस्थिती आहे. कारण कोल्हापूरकरांमध्ये सतेज पाटील यांच्या वर्तनुकीवर, काँग्रेस पक्षावर प्रचंड संताप आहे. काँग्रेस पक्षावर लोक अगोदरच नाराज आहेत. खोटा अजेंडा राबवून काँग्रेस मतं मागते," असेही महाडिक म्हणाले.
Dhananjay Mahadik Video News :
हेही वाचा :