(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : दर वेळी काय तेच ते! पुण्यात अजित पवार पुन्हा पत्रकारांवर भडकले, नक्की काय घडलं?
तेच तेच प्रश्न विचारु नका आणि महत्वाचं म्हणजे कोणता नेता काय बोलला आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? हे अजिबात विचारु नका म्हणत अजित पवार पत्रकारांवर भडकले होते.
पुणे : पुण्यात अजित पवार पुन्हा पत्रकारांवर भडकल्याचं पाहायला (ajit pawar) मिळालं. अजित पवारांना कंत्राटी भरती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात सगळी माहिती दिली आहे. त्यामुळे तेच तेच प्रश्न विचारु नका आणि महत्वाचं म्हणजे कोणता नेता काय बोलला आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? हे अजिबात विचारु नका म्हणत अजित पवार पत्रकारांवर भडकले. पुण्यात आज विविध विभागाच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते भडकल्याचं पाहायला मिळालं.
ललित पाटील प्रकरणावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार आहे. पोलिस यंत्रणा चौकशी करण्याचे काम करत आहे.न्यायालयात त्यांना हजार केले होते. ललित पाटील चौकशी होणार आहे. गृहमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या आहेत, यावर आता आरोप प्रत्यारोपदेखील सुरू आहेत. मात्र चौकशीतून सगळे समोर येईल.
सध्या सगळीकडे बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावरदेखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी स्पष्ट नाही न म्हणता. वेळ आली की सगळं बघू, असं ते म्हणाले आहेत.
कालवा समितीच्या बैठकीत काय झालं?
नीरा डावा कालवा तसेच नीरा उजव्या कालव्याचे रब्बीचे आवर्तन 10 नोव्हेंबरपासून सोडावे असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कालव्याच्या शेवटच्या (टेल) भागात योग्य दाबाने पाणी जाण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करणे आवश्यक आहे. पाणीपट्टीची थकबाकी वसूल करुन त्यातून दुरुस्तीची कामे करुन घ्यावीत. पाणीचोरीचे प्रकार टाळण्यासाठी सिंचन विभागाच्या मदतीला पोलीस बंदोबस्त देण्यात येईल. कालव्याच्या लगत आवश्यकतेप्रमाणे भारनियमन करावे, असे अजित पवार म्हणाले. नीरा उजवा कालव्यासाठी यावर्षी जवळपास 3.5 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे याबाबत योग्य नियोजन करावे. हे करत असताना सर्व चाऱ्या व उपचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. त्यासोबतच कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन 15 डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून आगामी काळात किती पाऊस पडतो याआधारे या वेळापत्रकात कमीअधीक बदल करावा,अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
इतर महत्वाची बातमी-