Sharad Pawar: कोल्हापूर झालं, आता शरद पवार पुढचा गळ चिंचवडमध्ये टाकणार? आता माघार नाही म्हणत नाना काटे तुतारी फुंकण्याच्या तयारीत
Sharad Pawar: कोल्हापूर नंतर आता शरद पवार पुढचा गळ अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये टाकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
चिंचवड: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात गाठीभेटी, सभा, बैठका, पक्षप्रवेश या घडामोडींना वेग आला आहे. अशातच काल(मंगळवारी) कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजीत घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर अनेक नेते शरद पवार, आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहेत, या आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. असं असतानाच आता शरद पवार (Sharad Pawar) पुढचा गळ अजित पवारांच्या (Ajit Pawar) बालेकिल्ल्यात अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये टाकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता
चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे (Nana Kate) शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे. नाना काटे (Nana Kate) यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. म्हणूनचं की नानांनी आता आगामी विधानसभा लढण्याचा निश्चय केला आहे. अजित दादांना ही त्यांनी आता माघार नाही, असं स्पष्टपणे कळवल्याचं समजतंय. चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे. त्यामुळे नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. तूर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत, मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तरी मी चिन्हावरचं ही निवडणूक लढणार असं म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे.
महायुतीच्या जागावाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपला जाण्याची शक्यता
महायुतीच्या जागावाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपला, तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता आहे, तर या मतदारसंघातून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मी अजित पवारांच्या संपर्कात...
एबीपी माझाशी बोलताना नाना काटे म्हणाले, जेव्हापासून विधानसभा निवडणुकीचे वेध सुरू झाले आहे. तेव्हापासून मी अजित पवारांच्या संपर्कात आहे.मी त्यांना सांगितलं आहे, येणारी विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्या दिवशी दादांनी सांगितली तू तुझ्या पध्दतीने लोकांच्या संपर्कात राहा, गाठीभेटी घे, अद्याप कोणतीही जागा निश्चित झालेली नाही. त्यामुळं संपर्क चालू ठेव. येणारी विधानसभा मी लढणार आहे, त्यामुळं आता माघार नाही, असंही नाना काटे (Nana Kate) यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांसोबत जाणार का?
जर जागा सुटली नाही, तरी मी उभा राहणार आहे त्यात काही वाद नाही, शरद पवारांच्या संपर्कात आहे का या प्रश्नावर नाना काटे म्हणाले, नाही, अद्याप कोणतीच चर्चा नाही, ज्या पक्षाकडे उमेदवार नाही त्यांची चाचपणी सुरू आहे, गेल्या पोटनिवडणुकीत लाखाच्या वर मी मते घेतली होती, अद्याप मला कोणत्या पक्षांने संपर्क साधला नाही. पण, मी ही निवडणूक लढणार आहे, मी दादांशी चर्चा करतोय, दादा म्हणाले अद्याप कोणत्याच पक्षाला ही जागा गेलेली नाही, त्यामुळे आपण या जागेची मागणी करत आहोत. मी माझ्या पक्षाच्या ज्या एक-दोन सीट आहेत, त्यामुळे मी ही जागा मागू शकतो, असंही नाना काटे (Nana Kate) म्हणालेत.
त्याचबरोबर ही जागा भाजपला मिळाली अजित पवारांना मिळाली नाही तर, या प्रश्नावर उत्तर देताना नाना काटे म्हणाले, घड्याळाला जागा मिळाली नाही तरी देखील मी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता ही जागा भाजपाने सोडली नाही तर या मतदारसंघात पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.