राज-उद्धव एकत्र आल्यास मविआचं काय होणार? काँग्रेसकडून पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट
Maharashtra Politics: दोन पक्षांबरोबर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता यापुढे राज व उद्धव ठाकरेंमधील युतीवर काँग्रेसने पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली आहे.

Vijay Wadettiwar: राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चांगल्या चर्चा रंगल्या आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thakeray) उद्धव ठाकरेंसोबत ( Uddav Thakeray) काम करण्याचे संकेत दिले. त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिटाळी दिल्यानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान राज उद्धव एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार? असं विचारल्यानंतर काँग्रेसकडून पहिल्यांदाच यावर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. राज - उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची आहे. राज उद्धव एकत्र आले तर मविआचं काय करायचं ते ठरवू. आधी त्या दोघांचं काय ते ठरवू द्या, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणालेत.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
राज- उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत. महाविकास आघाडी ही काही 20-25 वर्षांची नाही. दोन पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्या वेळची राजकीय गरज म्हणून मवीआ तयार झाली. राज उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय करायचं ते ठरवू. आधी त्या दोघांचं काय ते ठरू द्या. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. त्यात आम्ही पडणार नाही. असंही वडेट्टीवार म्हणालेत.
दरम्यान, दोन्ही पक्षांचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांच्या टाळीला प्रतिटाळी दिल्यामुळे राज्यभर नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांचे नेते यावर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, दोन पक्षांबरोबर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता यापुढे राज व उद्धव ठाकरेंमधील ही युती कधी होणार? युती होईल का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंची प्रतिसाद
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याहीपुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही,पण प्रश्न इच्छेचा आहे असं ते म्हणाले होते. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.आपल्याकडून भांडणं नव्हती, मराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगत राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा. असंही ते म्हणाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:
























