संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन बीडमधील खूनाच्या घटनेसह विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घटना समोर आली आहे
मुंबई : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बीडमधील (Beed) सरपंच हत्याप्रकरणावरुन गदारोळ पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन संताप व्यक्त करत आरोपींच्या अटकेची व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. तसेच, याप्रकरणातील सूत्रधारांवर देखील हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे. राज्यात हे प्रकरण ताजे असतानाच शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रात कोणाचा कधी खून होईल अशी परिस्थिती असल्याचं म्हटलंय.
एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन बीडमधील खूनाच्या घटनेसह विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुखसारखं काही करण्याचा प्रयत्न होतोय का?
माझ्या घराप्रमाणे सामना कार्यालयाची देखील रेकी झालेली आहे. माझ्या घराची रेकी झाली आहे, दिल्लीच्या घराची पण झाली आहे. पोलीस चौकशी करत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील या प्रकरणात अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आहे. माझी सुरक्षा काढून टाकलेली आहे, संतोष देशमुख सारखं काही करण्याचा प्रयत्न होतो आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अजिबात राहिली नाही, कल्याणमध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले, आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून वारंवार असे होताना पाहायला मिळत आहे. कोणाचा कधीही खून होईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्या घराच्या रेकीसंदर्भाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
हेही वाचा
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा