Ramdas Athawale: माझी राज्यसभेची दोन वर्षे शिल्लक, शिंदेंच्या खासदाराला तिकडे पाठवा; मला शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी द्या: रामदास आठवले
Loksabha Election: शिंदेच्या खासदाराला माझ्याऐवजी राज्यसभेत पाठवा, मी शिर्डीतून लोकसभा लढवतो; रामदास आठवलेंचा प्रस्ताव. महायुती रामदास आठवलेंचा प्रस्ताव मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.
शिर्डी: कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवायचीच, असा चंग बांधलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी आता महायुतीसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पण या जागेवर सध्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे (Sadhashiv Lokhande) हे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वाट्यालाच येण्याची शक्यता आहे. मात्र, या जागेवरुन मला लोकसभा निवडणूक लढवू द्या. माझी राज्यसभेतील आणखी दोन वर्षांची टर्म बाकी आहे. त्याठिकाणी सदाशिव लोखंडे यांना राज्यसभेवर पाठवावे, असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी मांडला आहे. आता महायुती हा प्रस्ताव मान्य करुन रामदास आठवले यांना शिर्डीतून संधी देणार का, हे पाहावे लागेल.
रामदास आठवले हे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी शिर्डीत असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, महायुतीमधील घटकपक्षांनी जागावाटपावरुन फार खेचाखेची करु नये. भाजप कोणताही पक्ष संपवायला निघालेला नाही. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री असताना मला चांगली संधी उपलब्ध होईल. शिर्डी संस्थानाला बळकट करण्यासाठी मी काम करेल, असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. शिर्डी मतदारसंघात बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २००९ नंतर या मतदासंघात बौद्ध समाजाला संधी मिळाली नाही. अनुसूचित जातीत बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्याने उमेदवारी संदर्भात बौद्ध बांधवांच्या अपेक्षा असतील तर भाजपने याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
आमच्या पक्षाला एकही जागा दिली नाहीत तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही: रामदास आठवले
रामदास आठवले यांनी यापूर्वीही शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी भाजपकडे कळकळीची विनंती केली होती. शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला दिले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी महायुतीला एक भावनिक आवाहन केले होते. महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा सोडली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते.
आणखी वाचा