Pankaja Munde: बीडमधील व्हायरल ऑडिओ क्लीपवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, धनुभाऊचंही नाव घेतलं
माझ्या माहितीप्रमाणे ते (रविकांत राठोड) राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, जे सध्या महायुतीसोबत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे ते समर्थक आहेत, मुंडेंच्या टीमने त्यांच्याशी संपर्क केला होता.
बीड : लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चर्चेत असलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात यंदा चांगलीच लढत रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेनंतर येथील वातावरण आणखी रंगतदार बनले आहे. त्यातच, मोदींच्या सभेनंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंची (Pankaja Munde) एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून या क्लीसंदर्भात स्वत: पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. खरं तर ती क्लीप अदखलपात्र आहे. तुम्ही हजार वेळा ही क्लिप ऐकल्यावरही तुम्हाला यात काहीही नाही हे कळेल. विशेष म्हणजे मोदींची सभा झाल्यावरच ही क्लिप व्हायरल का झाली?, असा सवाल पंकजा मुंडेंनी केला आहे. दरम्यान, बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होत असून 48 तासांत येथील प्रचारच्या तोफा थंडावतील.
माझ्या माहितीप्रमाणे ते (रविकांत राठोड) राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, जे सध्या महायुतीसोबत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे ते समर्थक आहेत, मुंडेंच्या टीमने त्यांच्याशी संपर्क केला होता. त्यावेळी त्या उमेदवाराने पंकजा मुंडेंनी स्वत: बोलावे असे सांगितले. त्यामुळे, मी फोन करुन बोलले, माझा व त्यांचा परिचय नाही. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही, किंवा संपर्कही नाही. माझ्या कार्यकर्त्याने फोन लावून दिल्यानंतर मी त्यांच्याशी बोलले. मी अगदी निस्पृहपणे बोलत आहे. त्या क्लिपमध्ये मी म्हणाले आहे की, माझ्या औकातीप्रमाणे मी त्यांना मदत करेल, असे आश्वासन मी त्यांना दिले.
विशेष म्हणजे मुद्दामहून ही निवडणूक एका पीकवर असताना ही क्लिप बाहेर आली हे आपण बघितले पाहिजे. मी त्यांना ओळखत देखील नाही. पण, धनंजय मुंडे यांनी मला सांगितल्यामुळे मी बोलले, त्यात आमचा सहकारी असलेल्या पक्षाचा उमेदवार नसावा अशी भावना प्रत्येकाची असते, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडेंना व्हायरल ऑडिओ क्लीपवर दिली.
या निवडणुकीमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले. या निवडणुकीमध्ये अफवा पसरवल्या गेल्या आहेत. पण, मी मागचे 22 वर्षे पासून कॅलिबरसांभाळून काम करत आहे. मला आज या निवडणुकीमध्ये वेदना झाल्या, पण शेवटी मी जिल्ह्यातील लोकांना वेगळ्या वळणावर नेत आहे, असे म्हणत यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव उमेदवार म्हणून पंकजा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला.
मोदींच्या सभेला दुप्पट गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जागा पुरली नाही. आम्हाला जी अपेक्षा होती, त्यापेक्षा दुप्पट गर्दी झाली. ज्या पद्धतीने ही निवडणूक हेल्दी वातावरण, व वेगळ्या उंचीवर सुरू झाली. कार्यकर्त्यांचा अॅप्रोच निर्भीड आहे, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
ऑडिओ क्लीपमध्ये काय आहे?
बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. एवढेच नाही तर बंजारा समाजाची मतंही मलाच मिळणार आहेत. मात्र, त्यातले दहा पाच हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असेही यावेळी पंकजा मुंडे ऑडिओ क्लीपमध्ये म्हणताना ऐकायला येत आहे.
कोण आहेत रविकांत राठोड
रविकांत राठोड हे आधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र, बीड लोकसभेसाठी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात ते आता काम करत आहेत. दरम्यान, यापूर्वी गत 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी उेमदवारी अर्ज भरुन निवडणूक लढवली होती.
बजरंग सोनवणेंची मागणी
व्हायरल ऑडिओ क्लीपवर निवडणूक आयोगाने यात पुढाकार घेऊन चौकशी करावी. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी देखील स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे. ताईसाहेब ज्या माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उभ्या आहेत. त्यांना असं बोलण्याचा अधिकार आहे का? आचारसंहिता सुरु असताना असे भाष्य केले आहे. हे तपासले गेले पाहिजे. त्यांनी लोकांना लालसा दाखवणे, चुकीचे आहे. आचारसंहितेचा भंग होत आहे. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार होतो. मात्र, निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी केली आहे.