Baramati Assembly Constituency: जय पवारांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह; बारामती विधानसभेच्या रिंगणात कुणाची वर्णी लागणार?
Baramati: बारामतीतून जय पवारांनी लढावं, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे बारामतीतुन अजित पवार लढणार की जय पवारांना उमेदवारी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
Baramati Assembly Constituency बारामती: राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय नेते आपल्या मुलांना विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) पुढं आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच बारामतीतून (Baramati) जय पवारांनी (Jai Pawar) लढावं, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे बारामतीतुन अजित पवार (Ajit Pawar) लढणार की जय पवारांना उमेदवारी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
बारामती विधानसभेच्या रिंगणात कुणाची वर्णी लागणार?
विधानसभेचं रणशिंग वाजलेय. अनेक नेते आपल्या मुलांना उमेदवारी मिळावी यासाठी धडपड करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. एकीकडे जरी कार्यकर्ते मागणी करत असले तरी, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे बडे नेते बारामतीतून विधानसभा अजित पवारच लढणार असल्याचं सांगत आहेत. जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर पार्लमेंटरी बोर्डात विचार करू, असे अजित पवारांनी या पूर्वीच सांगितले आहे. मात्र, आज पर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजवणारे अजित पवार यांना मात्र लोकसभेत दारुण पराभव स्वीकारावा लागला.
लोकसभेवेळी जर मला मिठाचा खडा लागला तर विधानसभेला मी विचार करेल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली होती. लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते. अशातच आता लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत जय पवार ॲक्टिव्ह झाले आहेत. जय पवार बारामतीत जनता दरबार देखील घेत होते. तसेच ते बारामती तालुक्याचा दौरा करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील बारामतीतून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवारांना संधी मिळावी, अशी मागणी केली आहे.
अजित पवारांनीच बारामती मधून लढावं, पश्चिम पट्ट्यातील लोकांची मागणी
दरम्यान, दुसरीकडे बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील लोक अजित पवारांनीच बारामती मधून लढावं, अशी मागणी करत काही दिवसापूर्वी अजित पवारांचा ताफा देखील अडवला होता. तर मला अजितदादा सारखं काम करायची जर संधी मिळाली तर ते करू, असं जय पवार एबीपी माझा शी बोलताना दोन सप्टेंबर रोजी म्हणाले होते. अशातच आजपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांना निवडून येणं सोपं होतं. परंतु पक्षात फूट पडली पवारांच्या घरात देखील दोन गट निर्माण झाले. तेव्हापासून पवारांसाठी ही निवडणूक आता अवघड ठरू लागली आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी मिळणार असल्याची चर्चा जोर धरते आहे. तर अजित पवार बारामतीतून न लढल्यास जय पवारांना संधी मिळणार का? कार्यकर्त्यांनी तर जय पवारांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
मात्र ही कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण होते का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. राज्यातील अनेक नेते आपल्या मुलांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतात, त्यात अगदी बबन दादा शिंदे असतील, सुमन पाटील असतील किंवा संजय काका पाटील असतील. यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील की आपल्या मुलांना अनेक पक्षाचे नेते प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र बारामतीत ऍक्टिव्ह असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना संधी आता मिळणार का हा खरा प्रश्न आहे.
हे ही वाचा