Girish Mahajan : गिरीश महाजन आक्रमक, एकनाथ खडसे आणि अनिल थत्तेंना नोटीस धाडली, IAS महिलेशी संबंध जोडल्याचा आरोप!
Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी केला होता. यावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

Girish Mahajan : पत्रकार अनिल थत्ते (Anil Thatte) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून अब्रु नुकसानीची नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर गिरीश महाजन यांच्याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
महाजनांनी एकनाथ खडसे आणि अनिल थत्तेंना धाडली नोटीस
आता गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीची नोटीस बजावली असल्याची माहिती महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर टीका केली. जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाली आहे. या विषयात आता आपण कोर्टातच लढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे माहिती एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला होता. एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या रंगला रात्री अशा, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणं उचित होणार नाही. अमित शाह यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांना सांगितलं की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहे. यावेळी महाजनांनी सांगितले की, नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. अमित शाह यांनी त्यांना सांगितलं की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर-शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझं सीडीआर खरं बोलतो. रोज बोलण्याचं काय कारण आहे? असे प्रश्न अनिल थत्तेंनी शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले, असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा























