Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
Eknath Shinde and Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस आणि शिंदेंमध्ये अँटी चेंबरमध्ये चर्चा
मुंबई: एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळात सामील होणार की नाही, याबाबत निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला आहे. एकनाथ शिंदे हे गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात (Mahayuti Oath Taking Ceremony) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी पार पडलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेतही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला मंत्रिमंडळातील सहभाग निश्चित नसल्याचे संकेत दिले होते. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्री मिळावे, यावर ठाम होते. परंतु, त्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना, तुमच्या मागण्यांबाबत भाजपकडून विचार केला जात असल्याचे सांगितले. तसेच या चर्चेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपदाच्या मोबदल्यात महसूल हे महत्त्वाचे खाते सोडण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दाखवल्याचे समजते.
देवाभाऊंनी एकनाथ शिंदेंना नेमकं काय सांगितलं?
तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. आपण एकत्र निवडणूक लढली. आपण अडीच वर्षे एकत्र काम केलं. तुमच्या मागण्या आमच्यासमोर आहेत. आम्ही त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढू...वरिष्ठांकडून तुमच्या मागणीवर चर्चा केली जातेय. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील व्हावं...शपथविधीला मी आणि फक्त अजित पवारांनी शपथ घेतल्यास ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना केली.
भाजप एकनाथ शिंदेंसाठी महसूल खातं सोडणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत गृहखात्याबाबत चर्चा झाली. परंतु, भाजप गृहखाते सोडायला तयार नाही. त्यानंतर ही चर्चा महसूल खात्यापर्यंत आली आणि भाजप महसूल खातं एकनाथ शिंदेंना देण्यास तयार आहे. याबाबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे समजते. या सकारात्मक चर्चेंनंतर एकनाथ शिंदे यांनी मी तुमच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, अशी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?