Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
PM Modi Mahayuti Oath Taking Ceremony: एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही? शिंदेंची गृहमंत्रीपदाची मागणी भाजप मान्य करणार?
मुंबई: महायुती सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता या शपथविधी सोहळ्याला (Mahayuti Oath Taking Ceremony) सुरुवात होईल. मात्र, या सोहळ्यात नेमके किती जण शपथ घेणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. कारण, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या कार्यालयाकडून अवघ्या 20 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला फक्त 20 मिनिटंच उपस्थित राहू शकणार आहेत. पण मोदींनी या सोहळ्यासाठी एक तासांचा वेळ राखून ठेवावा, अशी मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) करण्यात आली आहे. तसे झाले तर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह तिन्ही पक्षांचे काही मंत्रीदेखील शपथ घेऊ शकतात. परंतु, मोदी 20 मिनिटंच उपस्थित राहिल्यास केवळ एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होईल, अशी चर्चा आहे. मात्र, आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार, याबाबतचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यातील सर्वात उत्सुकता लागून राहिलेली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही? बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. परंतु, वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. एकनाथ शिंदे हे अद्याप गृहमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहेत. परंतु, भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपण वरिष्ठांना विचारुन कळवतो, असे एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली आहे.
शिवसेनेच्या आमदारांचा एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आग्रह?
एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपद न मिळाल्यास उपमुख्यमंत्रीपदी बसण्यास राजी नसले तरी त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी आग्रही भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना तुम्ही सरकारमध्ये सामील होणे, किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, ही आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी दिली.
आणखी वाचा