Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना भाजपने काय आश्वासनं दिली असावीत?, याबाबत आता इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
Devendra Fadnavis Eknath Shinde मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शपथविधीबाबतचा सस्पेन्स संपला अखेर संपला आहे. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या शपथविधी कार्यक्रमात तीन जण शपथ घेणार असून यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेणार आहेत.
उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंची समजूत नेमकी कशी काढली, गृहखात्याचा, नगरविकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते. मग तडजोड कशी झाली?, एकनाथ शिंदेंनी काँप्रोमाईज केलं असं दिसतंय का?, एकनाथ शिंदेंना भाजपने काय आश्वासनं दिली असावीत?, याबाबत आता इनसाईड स्टोरी समोर आली आहे. (Inside Story Of Eknath Shinde And Devendra Fadnavis)
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत काय झालं?, Inside Story
दिल्लीतील भेटीनंतर राज्य पातळीवर चर्चा करायची होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु होती. याची सुरुवात झाली ती गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहचले. एकनाथ शिंदेंनी गृह खातं मागितलं होतं. मात्र त्यावर भाजपकडून कोणताही शब्द देण्यात आला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे आजारी पडले. यानंतर एकनाथ शिंदे दरेगावात असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांची विचारपूस केली आणि आपण मुंबईत या...आपण बोलू असं सांगितलं. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली की, तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. आपण एकत्र निवडणूक लढली. आपण अडीच वर्षे एकत्र काम केलं. तुमच्या मागण्या आमच्यासमोर आहेत. आम्ही त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढू...वरिष्ठांकडून तुमच्या मागणीवर चर्चा केली जातेय. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील व्हावं...शपथविधीला मी आणि फक्त अजित पवारांनी शपथ घेतल्यास ते योग्य दिसणार नाही, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना केली.
आमच्या पक्षाला बळ मिळावं, यासाठी योग्य तो निर्णय घेतला जावा- एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा बैठक झाली. यामध्ये खात्यांसंदर्भात चर्चा झाली. यामध्ये गृह खातं हा विषय होताच, पण गृह खातं भाजप सोडायला तयार नव्हतं. त्यानंतर ही चर्चा महसूल खात्यापर्यंत आली आणि भाजप महसूल खातं एकनाथ शिंदेंना देण्यास तयार आहे. याबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. याशिवाय एकनाथ शिंदेंना सन्मानपूर्वक मंत्रिपदं दिली जातील, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना दिलं. या सकारात्मक चर्चेंनंतर एकनाथ शिंदे यांनी मी तुमच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. पण आमचा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमच्या पक्षाला बळ मिळावं, यासाठी योग्य तो निर्णय घेतला जावा, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावर देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक उत्तर दिल्यानं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार झाल्याची माहिती मिळत आहे.
12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा-
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे भगव्या रंगाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत.