Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दूल्ला...
Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यादरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते दोन पक्ष आहेत.. भाऊ आहेत.. काका पुतणे आहेत.. त्यांचं त्यांना ठरवायचं आहे. त्यांचं ठरलं तर प्रतिक्रिया देऊ...त्यामुळे बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोन भावांमध्ये किती संवाद आहे माहित नाही. मात्र माध्यमांमध्येच जास्त उत्सुकता दिसतेय. मला सध्या यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मनसेकडून प्लॅन ए आणि प्लॅन बीची तयारी-
महापालिका निवडणुकांसाठी थोरल्या ठाकरेंशी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करायची? की गेल्या काही निवडणुकांप्रमाणे एकला चलोरेच्या ट्रॅकवरच इंजिन पळवायचं? याची मनसेकडून चाचपणी सुरू आहे. मागचे अनुभव पाहता मनसेनं प्लॅन ए आणि प्लॅन बीची तयारी केल्याची माहिती मिळतेय. मनसेच्या केंद्रीय समितीनं मुंबईबाबतचा अहवाल राज ठाकरेंना सोपवलाय. ज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी आणि महायुतीची ताकद या दोन्हींबाबत विश्लेषण करण्यात आल्याचं समजतंय.
मातोश्रीकडे निघालो..., राज ठाकरेंच्या विधानाने भुवया उंचावल्या-
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची उत्सुकता ताणली गेलीय. आणि हे उत्तर जाणून घेण्यासाठी सदैव शीवतीर्थ म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर तळ ठोकून बसलेल्या पत्रकारांची राज ठाकरेंनी फिरकी घेण्याची संधी साधली. राज ठाकरेंनी घराबाहेर पडताच गाडीची काच खाली करून काही पत्रकारांना बोलवून घेतलं. पत्रकारांनी गप्पा मारायला सुरूवात केली. पत्रकारांनी विचारलं कुठे निघालात. मातोश्रीकडे निघालो असं राज ठाकरे म्हणाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मात्र राज ठाकरेंच्या वक्तव्याची ब्रेकिंग न्यूज होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी खरं सांगितलं ते मातोश्रीकडे नव्हे तर त्यांच्या बहिणीकडे निघाले होते.
























