Vidhansabha Monsoon Session: विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट, हसतखेळत संवाद, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics: विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनातील राजकीय भेटीगाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. आज विधिमंडळाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आले.
मुंबई: लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. आता हा बदल कधी प्रत्यक्षात येणार हे माहिती नसले तरी गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे दिसून येत आहे. कारण कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी, एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असलेल्या ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये पुसटसा का होईना पण संवाद होताना दिसत आहे. या चर्चेसाठी पुन्हा एकदा निमित्त ठरली ती म्हणजे विधानभवनात मंगळवारी झालेली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आदित्य ठाकरे यांची भेट.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज नेहमीप्रमाणे विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना विधानभवनाच्या लॉबीत घडलेला प्रसंग सध्या सर्वतोमुखी झाला आहे. मंगळवारी दुपारी विधानभवनाच्या लॉबीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. काही दिवसांपूर्वी विधानभनवाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच भेट झाली होती. तोच धागा पकडत आदित्य (Aaditya Thackeray) यांनी मिश्कीलपणे भाष्य केले. यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात हसतखेळत संवाद झाला. आदित्य ठाकरेंना पाहून फडणवीसांनी विचारले की, नमस्कार काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी लिफ्टमधून चाललोय. आदित्य यांच्या या वाक्यावर देवेंद्र फडणवीस अगदी मनमोकळेपणाने खळाळून हसले. आदित्य ठाकरेही त्यावर जोरात हसले. यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकेची राळ उडवून दिली होती. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही परस्परांवर अगदी टोकाला जाऊन शाब्दिक वार केले होते. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील हा संवाद चर्चेचा विषय ठरत आहे.
माझा आणि देवेंद्रजींचा एकत्र लिफ्ट प्रवास हा योगायोग: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये आमनेसामने आले होते. या दोघांनी एकत्र लिफ्टने प्रवास केला. लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये संवादही झाला होता. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगचं आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे या पुढे गुप्त बैठक तिथेच करू, अशी मिश्कील टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.
आणखी वाचा