हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत.
Harshvardhan Patil : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. याची फक्त घोषणा बाकी आहे. मात्र, त्यांच्या या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे कार्यकर्ते पुढील दोन ते तीन दिवसांत एकत्र येऊन ठोस निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती. आज हर्षवर्धन पाटील त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान पत्रकार परिषद घेण्याआधी इंदापुरातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेतील. इंदापूर तालुक्यातील जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मधील दूधगंगा या ठिकाणी बैठकीसाठी बोलवले आहे. या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील भूमिका जाहीर करणार आहेत.
हर्षवर्धन पाटलांनी घेतला मोठा निर्णय
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आता लवकरच हर्षवर्धन पाटील हे जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: