Parbhani : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ; परभणी जिल्ह्यातील घटना
Parbhani News : परभणी जिल्ह्यात सेप्टिक टॅंकची (septic tank) सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू (workers died) झाल्याची घटना घडली.
Parbhani News : सेप्टिक टॅंकची (septic tank) सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू (workers died) झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टॅंक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात सेप्टिक टॅंकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं भाऊचा तांडा शिवारात शोककळा पसरली आहे. मृत झालेल्या पाच कामगारांमध्ये शेख सादेक (वय 55), शेख जुनेद (वय 32) शेख शारोक (वय 28), शेख नवीद (वय 28), शेख फेरोज (वय 29) यांचा समावेश आहे. अत्यवस्थ असलेल्या एका कामगाराला परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत पाचही कामगारांचे मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.