मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
कुणबी प्रमाणपत्रसाठी आलेल्या प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र द्या, याच अधिवेशनात सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला.
Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्रसाठी आलेल्या प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र द्या, याच अधिवेशनात सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला. मराठा समाजामुळेच हे सरकार सत्तेवर आले आहे. सरकारने न्याय नाही दिला तर 2029 मध्ये हाच समाज भाजपाला पायउतार करेल असा इशारा जरांगे पाटलांनी परभणीत दिला.
परभणीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसलेत
परभणीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आज याच शेतकऱ्यांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आणि आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपलं म्हणणं सरकार दरबारी मांडलं पाहिजे असेही मनोज जरांगे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आणि शेतकऱ्यांची महसूलमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जर शक्तिपीठ महामार्गाला जमिनी द्यायच्या नसतील तर सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करावी
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मनोज जरंगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की जय पवार कुटुंबीयांचं म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सध्या काम करताना जशी माहिती दिली जात आहे, त्याप्रमाणे आता सर्वांनाच वाटत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी परिवाराचे म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे असे ते म्हणाले. सरकारने जीआर काढला पण त्याची अंमलबजावणी अधिकारी कर्मचारी करत नाहीत, मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज येऊन पडले आहेत. पण त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्याचबरोबर कास्ट व्हॅलेडीटी साठी देखील अडवणूक केली जाते. सरकारकडून याविषयी अद्याप कारवाई करण्यात आली नाही. मला सरकारला म्हणायचं आहे की याच अधिवेशनामध्ये एक परिपत्रक काढावे जेणेकरून मराठा कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिली जातील. त्याचबरोबर सातारा गॅजट, औंध गॅझेटची अंमलबजावणी करण्या संदर्भात देखील शासन निर्णय सरकारने काढावा. जे मराठा बांधव शहीद झालेत त्यांच्या कुटुंबीयांच्या नोकरीचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. आंदोलन काळात झालेले गुन्हे देखील सरकारने अद्याप परत घेतले नाहीत, त्यामुळे सरकारने आता चालढकल करू नये. आम्ही जून पर्यंत सरकारला वेळ दिला आहे. जून पर्यंत सरकारने काय केलं नाही तर मात्र उपोषणाला आम्ही बसणार आहोत. त्यानंतर उपोषण करते मुंबईच्या दिशेने जर आले तर मग त्यांना कोणीही रोखू शकणार नाही याच मराठा समाजाने भाजपला सत्तेत बसवल्याचे जरांगे म्हणाले.
भाजपने मराठा समाजाचा सन्मान करावा अन्यथा 2029 मध्ये पायउतार व्हावे लागेल
कधी नव्हे तो मराठा समाजाने भाजपला मतदान केले आहे. भाजपने त्या मराठा समाजाचा सन्मान करावा अन्यथा 2029 मध्ये पायउतार व्हावे लागेल असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे
























