Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
एका राष्ट्रीयकृत बँकेच्या भोंगळ कारभाराचा फटका एका ७० वर्षांच्या महिलेला बसलाय. त्यामुळे तिला आपला जीवही गमवावा लागला... ही घटना आहे गडचिरोलीच्या पोर्ला इथली. खात्यातून पैसे काढण्यासाठी कोमामध्ये असणाऱ्या ७० वर्षांच्या महिलेला थेट बँकेत नेण्याची वेळ आली. आणि बँकेच्या या संवेदनहीन कारभाराच्या अगदी दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानं कुटुंबासह गावकरीही आक्रमक झालेत.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
70 वर्षीय शांताबाई मानकर या मागच्या काही दिवसापासून कोमात होत्या... त्यांना औषोधोपरचारासाठी पैशांची गरज होती. त्यांच्या खात्यावरचे पैसे काढण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई यांनी शांताबाईंच्या अंगठ्याचा ठसा घेतला आणि ते महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले... मात्र स्वत खातेदार उपस्थित राहिल्याशिवाय पैसे मिळणार नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. अखेर गाडीतून शांताबाईंना कोमात असतानाही बँकेत नेण्याची वेळ आली... आणि याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी शांताबाईंची तब्येत खालावली आणि त्यांचा दुर्देैवी मृत्यू झाला...
या घटनेची गंभीर दखल केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतलीय. आणि या संपूर्ण प्रकाराच्या संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आलेत. यासोबतच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विद्यमान कठोर नियमावलीत आवश्यक ते बदल करून अधिक कडक अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वास्तविक बँकेनं गंभीर आजारी खातेधारकाच्या नातेवाईकांकडे मेडिकल सर्टिफिकेट मागणं आवश्यक होतं. मात्र तसं न केल्याने बँकेच्या हेकेखोर धोरणामुळे जावई आणि मुलीला गंभीर आजारात कोमात असलेल्या शांताबाई यांना बँकेत घेऊन जावे लागले. कुटुंबावर यामुळे आपलं माणूस गमावल्याचा मोठा आघात झालाय. ज्याची भरपाई करणं शक्य नाही. मात्र हे घडवून आणण्यात ज्यांचा दोष होता, त्यांच्यावर तातडीनं कारवाई व्हावी हीच अपेक्षा.
All Shows


































