Godavari Express: नाशिककरांचे हाल, गोदावरी एक्स्प्रेस सुरू करा; संतप्त प्रवाशांची मागणी
Nashik Mumbai Godavari Express : गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी नाशिककरांनी केली आहे. पंचवटी एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
Nashik Mumbai Godavari Express : गेल्या तीन वर्षांपासून नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची परवड सुरूच आहे. मनमाडहुन कुर्ल्याला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही अद्याप सुरू झाली नाही तर पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगीही कमी झल्यानं प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशभरातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यात नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणारी पंचवटी एक्स्प्रेस आणि गोदावरी एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेसचा समावेश होता. प्रवाशांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचे पाच डबे कमी केले. त्यामुळे पासधारक आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. पंचवटी एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी होत असल्याने तीन साडेतीन तास उभं राहून किंवा मिळेल त्या जागेत बसून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये रोष असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. पंचवटी एक्स्प्रेस एवढ्याच महत्वाची मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने प्रवाश्यांची दुहेरी कोंडी होत आहे.
वारंवार मागणी करूनही गोदावरी एक्स्प्रेस सुरू होत नसल्याने नोकरी, शिक्षणानिमित्ताने मुंबईला जाणाऱ्या प्रवाश्यांचे हाल होत आहेत. पंचवटी एक्स्प्रेस चुकली तर ऑफीसच्या वेळेत मुंबईत पोहचताच येत नसल्याने अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे. ज्या मार्गावरील रेल्वे सेवा सुरू करायची आहे तिथला खर्च, प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला जातो, त्यानंतर निर्णय घेतला जातो अस सांगत नाशिकचा केंद्रात आवाज असणाऱ्या भारती पवार यांनीही यातून हात आखडता घेतला आहे.
सर्व व्यवहार सामान्य होत आतांनाच रेल्वे प्रवासावर लावणारी बंधने दूर करावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे, येत्या काही दिवसात पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगी वाढवणे आणि गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात संतप्त प्रवासी असल्यानं मोठा गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Nashik Crime : एक मृतदेह पालघरमध्ये, तर दुसरा नगरमध्ये; संपत्तीवर डोळा ठेवून माजी कुलसचिवांची मुलासह हत्या
- Ukraine : युरोपमधील दुसरा मोठा देश आहे युक्रेन, जाणून घ्या या देशाच्या खास गोष्टी
- Nashik News : नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचे पाणी प्रदूषित, पाणी गोदापात्रात सोडत असल्याचा स्थानिकांचा आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha