(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : एक मृतदेह पालघरमध्ये, तर दुसरा नगरमध्ये; संपत्तीवर डोळा ठेवून माजी कुलसचिवांची मुलासह हत्या
Nashik Crime News : नाशिकमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांच्या डॉक्टर पुत्राच्या हत्येचं गूढ उकललं. कापडणीस पितापुत्रांचा संपत्तीसाठी जीव घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपी राहुल जगतापला बेड्या.
Nashik Crime News : नाशिकमधील हायप्रोफाईल दुहेरी हत्येचं गूढ उकललं आहे. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशा या दुहेरी हत्येचा डीमॅट अकाऊंटवरून झालेल्या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी छडा लावला. आणि एका सधन बापलेकाचा त्यांच्या संपत्तीसाठी जीव घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपी राहुल जगताप याला बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकमध्ये राहणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा एमबीबीएसचं शिक्षण घेतलेला मुलगा डॉक्टर अमित या दोघांचा आरोपीनं गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांच्यावर दारू टाकून जाळलं आणि नानासाहेब यांचा मृतदेह पालघरमध्ये तर अमित याचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यात फेकून दिला.
नाशिकमध्ये एका हायप्रोफाईल कुटुंबातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असा हा सर्व घटनाक्रम आहे. विशेष म्हणजे, आरोपीनं देखील एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएसचे शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा अमित कापडणीस हे गंगापूर रोडवरील जुनी पंडीत कॉलनीत आनंद गोपाळ पार्क अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. कापडणीस यांच्याकडे असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीवर त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आणि शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या राहुल जगतापची नजर पडली. अन् त्यानं एक कट रचला.
नानासाहेब कापडणीस यांचा मुलगा अमित कापडणीस यांच्याशी जवळीक साधत राहुलनं त्याला दारूचं व्यसन लावलं आणि त्यांच्याकडून नानासाहेब यांची सर्व वैयक्तिक माहिती गोळा केली. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे, आठ ते दहा दिवसांच्या अंतरावरच कापडणीस बाप लेकाचा हातानं गळा दाबून त्यानं निर्घृण खून केला. त्यानंतर दोन्ही मृतदेहांच्या अंगावर दारू टाकून जाळून दिलं आणि त्यांची ओळख पटू नये या उद्देशानं नानासाहेब यांचा पालघर जिल्ह्यात तर अमितचा नगर जिल्ह्यात मृतदेह फेकून दिला.
याप्रकरणी अज्ञाताविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात आणि राजूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे कृत्य केल्यानंतर राहुल जगतापनं नानासाहेब कापडणीस यांचं व्यवहार हाताळत मालमत्ता हडप करण्याचा पराक्रम सुरू केला होता. तसेच कापडणीस यांच्या नावावरील घरावरही त्याचा डोळा होता. शेअर मार्केटमधील गुंतवणूक तसेच बँकेतील पैसे काढण्याचं काम त्यानं सुरू केलं होतं. शेअर मार्केटमधील 97 लाख रुपये आपल्या नावावर करत त्यातून रेंज रोव्हर ही आलिशान कार खरेदी केली होती.
मयत यांचे नातेवाईक म्हणजेच, अमितची आई आणि बहीण हे अमेरिकेत राहत असल्याचा राहुल जगतापला समज होता. मात्र मुंबईतच राहत असलेल्या अमितच्या बहीणीनं वडिल आणि भावाशी संपर्क न झाल्यानं सरकारवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत मयतांच्या डिमॅट अकाउंटवरून झालेल्या व्यवहारांचे आधारे राहुल जगतापला बुधवारी बेड्या ठोकल्या. डिसेंबर महिन्यात झालेला खून, जानेवारीत हरवल्याची तक्रार, फेब्रुवारीत गुन्ह्याची झालेली उकल आणि त्यातून निष्पन्न झालेला, हा सर्व प्रकार यामुळे पोलिसांना देखील धक्काच बसला आहे. सध्या राहुल जगतापला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे अजून काही संपत्ती त्यानं गोळा केली आहे का? यापूर्वी त्यानं असे काही प्रकार केले आहेत का? हा सर्व तपास पोलीस सध्या करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pune Crime : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
- Chandrapur News : शिकाऱ्याचीच झाली शिकार; वाघ, बिबट्यांची शिकार घडवून आणणारा वनविभागाचा खबरी गजाआड
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरण; बारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha