Nanded Rain : नांदेडमधील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस, इस्लापूरमध्ये जीव मुठीत धरुन विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून प्रवास
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. इस्लापूर इथे पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Nanded Rain : मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (vidarbha) मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. इस्लापूर इथे पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शाळे शेजारील नाल्याला पूर आल्यानं विद्यार्थी शाळेतच अडकले होते. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं.
नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल
किनवट तालुक्यातील इस्लापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळं इस्लापूर येथील शाळेच्या रस्त्यावर असणाऱ्या नाल्याला पूर आला आहे. या पुरामुळं पालकांसह, विद्यार्थी व शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक नातेवाईकांची आणि पालकांची गर्दी झाली होती.
इस्लापूर येथील शाळेच्या रस्त्यावरील नाल्याला पूर आले आहे. यामुळं नागरिकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळं नळकांडी पूल हा रहदारीसाठी उंच करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. इस्लापूर गावातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यानं या रोडवर नेहमीच वाहनांची, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची वर्दळ असते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडं लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राज्यात मुसळधार पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान
सध्या राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: