Satara Rain : साताऱ्यातील वाई कवठेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीसह घरांचं मोठं नुकसान
सातारा (Satara) जिल्ह्यातही गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील वाई कवठेमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
Satara Rain : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यान नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच सातारा (Satara) जिल्ह्यातही गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील वाई कवठेमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसानं कवठे गावच्या हद्दीतील महामार्गावरील सर्विस रोडवर पाणी साठल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी या भागात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
शेतीसह घरांचं मोठं नुकसान
वाई कवठेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील कवठे गावच्या हद्दीतील महामार्गावरील सर्विस रोडवर पाणी साठले होते. हे पाणी सर्विस रोडवर शेजारी असलेल्या काही घरांमध्ये देखील शिरले. तसेच पावसाचं पाणी काही दुकानांमध्येही शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर काही घरात पाणी शिरल्याने लोकं पाण्यात अडकली होती. दरम्यान, सध्या पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. त्यामुळं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे या भागातील शेतीचं तसेच घरांचे मोठं नुकसान झालं आहे.
पर्यटकांची धांदल उडाली
साताऱ्या जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या ठिकाणच्या निसर्गाचं दर्शन घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, जोराच्या पावसामुळं पर्यटकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळं पर्यटकांची धांदल उडाली. पाचगणी आणि महाबळेश्वरच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे.
जुलै महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी
जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: