(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News :निवासी डॉक्टरांची खोली आहे की कोंबड्याचे खुरडे; एकाच खोलीत तीन डॉक्टरांची व्यवस्था, नागपुरातील शासकीय रुग्णालयातील स्थिती
GMC : मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही काम पूर्ण झाले नाही. मेयोमध्ये वसतिगृह बांधण्याचा चार वर्षांपूर्वीचा प्रस्ताव मंजूर आहे.
Nagpur GMC News : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (मेडिकल) GMC आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) IGGMC तील निवासी डॉक्टर समस्यांच्या विळख्यात सापडले. आहेत. समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांना नेहमीच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. केवळ आश्वासन मिळते आणि संप मिटतो. निवासी डॉक्टरांच्या निवासाचा प्रश्न वर्षानुवर्षे भेडसावत आहे. मेडिकलमध्ये 600 तर मेयोत 320 निवासी डॉक्टर आहेत. अपुरी निवास व्यवस्था असल्याने 8 बाय 10 च्या खोलीत दोन किंवा तीन डॉक्टर कसेबसे राहत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दोन वर्षांपासून बांधकाम सुरुच...
मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही काम पूर्ण झाले नाही. मेयोमध्ये वसतिगृह बांधण्याचा चार वर्षांपूर्वीचा प्रस्ताव मंजूर आहे. मात्र अद्यापही वसतिगृहाचे बांधकाम सुरू झालेले नाही. मेडिकल आणि मेयोला नवीन वर्षात नवीन वसतिगृह मिळतील या अपेक्षेत निवासी डॉक्टर आहेत. राहण्यासाठी जागा अपुरी असल्याने डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
583 निवासी डॉक्टरांसाठी फक्त 260 खोल्या
मेडिकलमध्ये 583 निवासी डॉक्टर आहेत. यात 60 टक्के पुरुष आणि 40 टक्के महिला आहेत. मार्ड वसतिगृहात 210 तर क्रमांक 6 मधील मुलांच्या वसतिगृहात 40 खोल्या आहेत. न्यू पीजी होस्टेलमध्ये 10 अशा एकूण 260 खोल्या आहेत. जुन्या 6 बंगल्यांमध्ये कनिष्ठ डॉक्टरांच्या तुकड्यांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक बंगल्यात 20 ते 25 निवासी डॉक्टर राहतात. नर्सिंग वसतिगृहातील 20 खोल्यांमध्ये महिला निवासी डॉक्टरांची सोय केली आहे.
वसतिगृहासाठी टाईमलाईन आवश्यक...
निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह अपुरे पडते. रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणाऱ्या निवासाचा प्रश्न उभा आहे. ना सुरक्षा, ना निवासाची योग्य सोय अशा चक्रव्युहात डॉक्टर सापडले आहेत. कोरोनासारख्या महामारीतही तीन-तीन जण एकाच खोलीत राहत होते. निवासी डॉक्टरांसाठी कधी सोयी सुविधायुक्त वसतिगृह तयार होतील, त्या दिवसाच्या प्रतिक्षेत आहोत. केवळ आश्वासनाचा श्वास घेऊन निवासी डॉक्टर सेवा देत आहेत. शासना प्रशासनाने मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सजल बन्सल यांनी सांगितले.
ही बातमी देखील वाचा...