बदलापुरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू
अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे.
कल्याण : फिरण्यासाठी गेलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांची गाडी उलटून अपघात झाल्याची घटना आज दुपारी बदलापूरजवळच्या बारवी धरण परिसरात घडली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत.
नुपम तायडे आणि रुतिका कदम अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे दोघे आज सकाळी आपल्या इतर पाच मित्रांसोबत बदलापूरच्या बारवी धरण परिसरात इर्टिगा गाडी घेऊन फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुळगावजवळ गाडी भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी उलटली.
या अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. तर इतर किरकोळ जखमींवर उपचार करुन त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे.
सर्व विद्यार्थी उल्हासनगरच्या एसएसटी कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षात शिकत होते. एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त ते फिरण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.