(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर, एकमेकांना शिव्यांची लाखोली
या व्हिडीओमध्ये नम्रता फाटक विरुद्ध विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांमध्ये शिवीगाळ आणि थेट झटापटीपर्यंतचा प्रकार दिसत आहे.
ठाणे : ठाण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हा वाद एवढा झाला की, या माजी नगरसेवकांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहल्याचेही दिसून आले. त्यांचा हा शिवीगाळीचा विषय थेट सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ सर्वप्रथम एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर सर्व स्तरातून शिवसेनेच्या या नगरसेवकांवर टीका होत आहे.
हा वाद पालकमंत्री गटातील माजी नगरसेवक विकार रेपाळे, माजी नगरसेविका नमता भोसले विरुद्ध आमदार रवींद्र फाटक यांच्या गटातील नम्रता फाटक यांच्यामध्ये झाला. यावेळी माजी नगरसेवकांनी एकमेकांना शिवीगाळ केलीच, शिवाय एकमेकांची लायकी काढली. भररस्त्यात घडलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये नम्रता फाटक विरुद्ध विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांमध्ये शिवीगाळ आणि थेट झटापटीपर्यंतचा प्रकार दिसत आहे. रहेजा येथील मेट्रोच्या ब्रीजखाली नम्रता फाटक यांच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाचे काम सुरु असताना, या ठिकाणी काम करु नका अशी सूचना विकास रेपाळे यांनी केली. मात्र आम्ही नियमाप्रमाणे काम करत असून आम्ही काम करणार अशी भूमिका फाटक यांनी घेतल्याने हा वाद वाढला. त्यामुळे नम्रता भोसले आणि नम्रता फाटक यांच्यात वाद एवढा विकोपाला गेला की शिवीगाळ आणि झटपटीपर्यंत हा वाद पोहोचला. याची तक्रार आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंयत गेली आहे.
परंतु दुसरीकडे सोशल मीडियावर देखील शिवसेनेची हीच संस्कृती असा सवाल उपस्थित करत असले नगरसेवक नकोच अशी टीका देखील नागरिकांनी केली आहे. त्यानंतर गुरुवारी (5 मे) माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. "काल आलेल्यांनी मला शिवसेना शिकवू नये, पक्षाच्या चाकोरी बाहेर काम करणार नाही, मी शांत आहे, मला दाबण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होतील, असा इशारा माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी दिला आहे.