नवी मुंबईत पॅराशूटद्वारे काही संशयास्पद लोक उतरल्याचा दावा
घणसोलीमधील खाडी किनारी असलेल्या स्कायलार्क सोसायटीसमोर हे पॅराशूट उतरल्याचे या इमारतीमधील रहिवाशांनी सांगितलं. पॅराशूटमधून उतरलेल्या तरुणीने आपल्याकडील बॅगेमध्ये पॅराशूट ठेवलं. त्यानंतर तिने पुन्हा काही अंतर चालत गाठलं आणि पुढे एका कारमध्ये बसून ती तरुणी क्षणात निघून गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.
नवी मुंबई : नवी मुंबईच्या घणसोलीतील रहिवासी सध्या दहशतीत आहे. घणसोलीतील खाडी किनारी पॅराशूटद्वारे काही संशयास्पद लोक उतरल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. पॅराशूटमधून परदेशी महिला उतरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे.
नवी मुंबईतील घणसोली सेक्टर 15 मधील खाडी किनारी असलेल्या पामबीच मार्गावर पॅराशूटने परदेशी महिला उतरल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्ती संशयास्पदरित्या पॅराशूटमधून उतरुन कारमधून निघून गेल्याचं काहींनी पाहिलं.
घणसोलीमधील खाडी किनारी असलेल्या स्कायलार्क सोसायटीसमोर हे पॅराशूट उतरल्याचे या इमारतीमधील रहिवाशांनी सांगितलं. पॅराशूटमधून उतरलेल्या तरुणीने आपल्याकडील बॅगेमध्ये पॅराशूट ठेवलं. त्यानंतर तिने पुन्हा काही अंतर चालत गाठलं आणि पुढे एका कारमध्ये बसून ती तरुणी क्षणात निघून गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर या भागातील सर्व सोसायटीमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. यामध्ये पॅराशूटमधून व्यक्ती उतरली असल्याचे दिसत नसले तरी रस्त्यावरून चालत जाताना दिसत असल्याचा दुजोरा पोलिसांनी दिला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कॅमेरासमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या भागात मोठ्या उंचीच्या इमारती आणि डोंगर नसल्याने येथे पॅराशूट उडवणे शक्य नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पॅराशूटने उतरलेली व्यक्ती लांबून आली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे पॅराशूटमधून कुणी दहशतवादी तर आले नाहीत ना? नवी मुंबईची हवाई रेकी केली गेली का? याची उत्तरे लवकरात लवकर मिळणं आवश्यक आहे. अन्यथा असंख्य प्रश्न पॅराशूटप्रमाणे नवी मुंबईकरांच्या मनात घिरट्या घालत राहतील.