'ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच, एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष' : संजय राऊत
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नसल्याची टीका केली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नसल्याची टीका केली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यभर संपूर्ण मंत्रिमंडळ फिरतंय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत ते पाळले जात आहेत, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं हा त्यांचा अधिकार आहे. एका जागेवर बसून कामाची व्याप्ती वाढवून काम करण्याची डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
यावेळी मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, जनतेचं हित लक्षात घेऊन सरकारनं मंदिरांबाबत निर्णय घेतला आहे. सरकारला मंदिरं बंद करण्याची हौस नाही. फक्त राजकारणासाठी विरोध करू नये, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. पंढरपूरला आंबेडकरांच्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाला. या सर्वांनी थोडा संयम बाळगायला हवा, महाराष्ट्राचं अहित होणार नाही याचं भान ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारप्रमाणे कोरोनाला 'ऍक्ट ऑफ गॉड' मानायला तयार नाही, असं राऊत म्हणाले.
...तर चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं; संजय राऊतांकडून कंगनाचा समाचार
बदल्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकार बदललं की बदल्या करायच्या नाही असं संविधानात लिहिलंय का? यापूर्वीच्या किंवा केंद्राच्या सरकारमध्ये बदल्या झाल्या नव्हत्या का? असा सवाल त्यांनी केला. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुबांची जबाबदारी घेण्यासंदर्भात बोलणार आहे. पुण्यात अँब्युलन्स मिळू नये हे दुर्देवी आहे,असंही राऊत म्हणाले.
आरे संदर्भात मी विधान करणं योग्य नाही, त्या खात्याचे मंत्री अधिवेशनात याबाबत उत्तर देतील. आमच्या विरोधी पक्ष नेत्यांची वैचारिक क्षमता कोरोनापासून अर्थव्यवस्था या विषयांवरही राष्ट्रीय पातळीवरची आहे, असंही राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी कायदेभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं : संजय राऊत
पाकिस्तानच्या बाबतीत नेहमीच ढग दाटून येतात पण चीनच्या बाबतीत हे ढग कुठे फुटतात हे कळत नाही, असा टोलाही त्यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात बोलताना लगावला.
कंगना रणौत सारख्यांना किती महत्व द्यायचं हे मीडियाने ठरवलं पाहिजे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा सवाल त्यांनी केला.